भाजपचा झेंडा उलटा फडकवीत मोदींचे स्वागत, सोलापुरातील घटनेने खळबळ

bjp-flag-solapur

लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांचा सोलापूर व माढा मतदारसंघांत दारुण पराभव झालेला असतानाच आज मोदींच्या शपथविधी सोहळय़ाला शुभेच्छा देण्यासाठी भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱयांनी झेंडा उलटा फडकविल्याच्या घटनेने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.

सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघांत भाजपचे उमेदवार राम सातपुते व रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा पराभव झाल्यानंतर भाजपमधील एक गटाने उघडपणे नाराजी व्यक्त केली. तसेच वरिष्ठांवर टीका करीत राजीनामा देत आहेत. दुसरीकडे भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे व माजी महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर ‘एनडीए’ सरकार आल्याने व मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्याने जल्लोष केला. यामुळे अनेकजण या घटनेवर टीकाटिप्पण्णी करीत आहेत. दोन उमेदवारांच्या पराभवाचे शल्य न ठेवता जल्लोष केल्याने वरिष्ठ नाराज आहेत. त्यातच भान हरपलेल्या कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर भाजपचा उलटा झेंडा फडकवीत मोदींचे स्वागत केल्याचे दिसून आले. या जल्लोषाकडे अनेकांनी पाठ फिरविली होती. मोजक्याच पदाधिकाऱयांनी उत्साहाचा आव आणत केलेला हा कार्यक्रम अनेकांच्या पचनी पडला नाही. मात्र, उलटा झेंडा फडकविल्याची जोरदार चर्चा भाजपच्या गोटात सुरू आहे.