
सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या अजित दादा गटाच्या उमेदवाराचा अर्ज टंकलेखनाच्या किरकोळ चुकीमुळे निवडणूक आयोगाने फेटाळून लावला आहे. इच्छुक उमेदवाराने या प्रकरणी हायकोर्टात दाद मागितली असून तुम्ही केलेली चूक निवडणूक अधिकारी सुधारू शकतात का, असा सवाल विचारत न्यायालयाने या प्रकरणी याचिकाकर्त्यांना सविस्तर माहिती सोमवारपर्यंत देण्याचे आदेश दिले.
सोलापूर पालिकेच्या निवडणुकीसाठी इरफान शेख यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. 30 डिसेंबर 2025 रोजी आपला उमेदवारी अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह त्यांनी सादर केला. अर्जात बहुतेक ठिकाणी प्रभाग क्र. 16 (डी) असा अचूक उल्लेख होता, परंतु एका ठिकाणी टायपिंगच्या चुकीमुळे प्रभाग क्र. 16 (के) असे लिहिले गेले होते. अर्जांच्या छाननी दरम्यान जेव्हा आक्षेप घेण्यात आला तेव्हा याचिकाकर्त्याने तत्काळ लेखी पत्र देऊन ही केवळ टायपिंगमधील चूक असल्याचे स्पष्ट केले. असे असतानाही शेख यांचा अर्ज फेटाळण्यात आल्याने शेख यांनी अॅड. ऋग्वेद किनकर यांच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.





























































