
एप्रिल आणि मे महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसाने सोलापूर जिह्यातील 32 हजार 761 शेतकऱयांच्या 22 हजार 196.81 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते. या बाधित शेतकऱयांना राज्य शासनाकडून 40 कोटी 87 लाख 95 हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. यामध्ये मोहोळ तालुक्यातील 1431 शेतकऱयांच्या वाटय़ाला पावणेदोन कोटी रुपये आले आहेत.
सोलापूर जिह्यात एप्रिल आणि मे महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱयांना तातडीने मदत मिळावी, यासाठी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पुढाकार घेतला होता. शेतकऱयांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून जिह्यातील 32 हजार 761 शेतकऱयांसाठी 40 कोटी 87 लाख 95 हजार 755 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. लवकरच ही रक्कम शेतकऱयांच्या बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे.
अवकाळी पावसानंतर जिह्यातील बहुतांशी तालुक्यांत खरीप हंगामाच्या पेरण्या वेळेवर झाल्या होत्या. त्यानंतर जिह्यात गेल्या 15 दिवसांपर्यंत पावसाने दडी मारली होती. एप्रिल आणि मे महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱयांना जाहीर झालेल्या मदतीत सर्वाधिक मदत ही करमाळा तालुक्यातील शेतकऱयांना मंजूर झाली आहे. त्याखालोखाल माढा तालुक्याचा नंबर लागतो, तर सर्वांत कमी मदत मंगळवेढा तालुक्यास मिळाली आहे.
तालुका, बाधित शेतकरी आणि कंसात मंजूर रक्कम पुढीलप्रमाणे
करमाळा: 8830 (14 कोटी 55 लाख रुपये), माढा: 10391 (14 कोटी 12 लाख 62 हजार रुपये), माळशिरस: 3173 (3 कोटी 42 लाख 28 हजार रुपये), बार्शी: 5208 (3 कोटी 25 लाख 39 हजार रुपये), मोहोळ: 1431 (1 कोटी 79 लाख रुपये), उत्तर सोलापूर: 2181 (1 कोटी 76 लाख 46 हजार रुपये), दक्षिण सोलापूर: 675 (92 लाख 86 हजार रुपये), पंढरपूर: 577 (92 लाख 86 हजार रुपये), सांगोला: 104 (18 लाख 76 हजार रुपये), अक्कलकोट: 148 (16 लाख 55 हजार रुपये), मंगळवेढा: 43 (4 लाख 70 हजार रुपये).
अवकाळीबाधित शेतकऱयांना जिरायत पिकासाठी 8500 रुपये हेक्टर, बागायतसाठी 17 हजार रुपये हेक्टर आणि फळबागांसाठी 22 हजार 500 रुपये हेक्टर याप्रमाणे मदत दिली जाणार आहे. याद्या तयार झाल्यानंतर ‘ई-केवायसी’ची प्रक्रिया करून त्यानंतर तहसील कार्यालयाच्या वतीने ही रकम शेतकऱयांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे.
– सचिन मुळीक, तहसीलदार, मोहोळ