
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या वाशीम येथील कारंजालाड व बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर इंटरचेंज येथील सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. सौरऊर्जा निर्मितीमुळे समृद्धी महामार्ग हा देशातील पहिलाच पथदर्शी प्रकल्प ठरला आहे.
नागपूर व मुंबईला जोडणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या 701 कि.मी. लांबीच्या द्रुतगती मार्गावरून आतापर्यंत सव्वा दोन कोटींहून अधिक वाहनांनी प्रवास केला आहे.
उत्पन्नाचा नवीन स्रोत
पहिल्या टप्प्यात समृद्धी महामार्गावरील वाशीम येथील तालुका कारंजालाड व बुलढाण्यातील तालुका मेहकर येथे सौरऊर्जा प्रकल्पाची क्षमता 9 मेगावॅट आहे. त्यापैकी कारंजालाड येथील 3 मेगावॅट व मेहकर येथील प्रकल्पातून 2 मेगावॅट वीज निर्मितीस सोमवारी प्रारंभ झाला. सौरऊर्जा निमितीच्या माध्यमातून महामंडळाला पथकराव्यतिरिक्त उत्पन्नाचा नवीन स्रोत उपलब्ध झाला आहे.
इंटरचेंजवर सौरऊर्जा प्रकल्प
केवळ समृद्धी महामार्गच नाही, तर इतर प्रस्तावित महामार्गाच्या इंटरचेंजवर सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याचा विचार आहे. सौरऊर्जा निर्मितीच्या माध्यमातून कार्बन क्रेडिट हेदेखील महामंडळांच्या खात्यात जमा होईल.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली महामंडळाच्या टीमने सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला आहे.