मुख्यमंत्री फडणवीस खोटे बोलत आहेत… सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा गंभीर आरोप

सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांना माझ्या मुलाचे खून प्रकरण दाबायचे आहे. ते सभागृहात खोटे बोलून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सोमनाथच्या आई विजया सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.

परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. सोमनाथच्या मृतदेहाचे छत्रपती संभाजी नगरमधील घाटी रुग्णालयात कॅमेऱ्यासमोर शवविच्छेदन करण्यात आले होते. शवविच्छेदन अहवालात पोलिसांच्या मारहाणीमुळेच सोमनाथचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर मुंबईतील जेजे रुग्णालयातही सोमनाथच्या मृतदेहाचे पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले. जेजे रुग्णालयाच्या अहवालाचा दाखला देत मुख्यमंत्र्यांनी सोमनाथचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे विधानसभेत सांगितले होते.

मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर आक्षेप घेत सोमनाथच्या आई विजया सूर्यवंशी यांनी गंभीर आरोप केले. माझ्या मुलाला हृदयविकार नव्हता. मुख्यमंत्र्यांना माझ्या मुलाचा खून पटवायचा आहे. आम्हाला सरकारवर विश्वास नाही. कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत, मात्र मुख्यमंत्री ऐकत नाहीत. सभागृहात खोटे बोलून मुख्यमंत्री आरोपींना वाचवत आहेत, असा आरोप करत मुख्यमंत्री साहेब तुम्ही किती खोटे बोलणार आहात? असा सवालही विजया सूर्यवंशी यांनी केला आहे.