
भाजपशासित गुजरातमध्ये घोटाळ्यांतील सत्ताधाऱयांचा सक्रिय सहभाग समोर येत आहे. बहुचर्चित मनरेगा घोटाळ्यात भाजपचे मंत्री बच्चूभाई खाबड यांचा मुलगा बलवंत खाबड याला पुन्हा अटक झाली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपची नाचक्की झाली आहे. विशेष म्हणजे बलवंत हा दोन दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर आला होता.
कोटय़वधी रुपयांच्या मनरेगा घोटाळा प्रकरणात बलवंत खाबडला दोन महिन्यांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. याच प्रकरणात पोलिसांनी नवीन गुन्हा दाखल केला असून त्या गुह्यात खाबडला पुन्हा अटक केली आहे. एप्रिल महिन्यात बलवंत व त्याचा भाऊ किरणविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोघांना 29 मे रोजी जामीन मंजूर झाला. त्यामुळे दोघे तुरुंगातून बाहेर आले होते. त्यानंतर दोन दिवसांतच बलवंतला पुन्हा तुरुंगाची हवा खावी लागली आहे. दाहोत पोलिसांनी बलवंतविरोधात गुन्हा दाखल करून त्याला 31 मे रोजी पुन्हा अटक केली आहे. बलवंतविरोधातील हा तिसरा गुन्हा असल्याचे पोलिसांनी सांगितले.