
मध्य प्रदेशमधील इंदूर येथील राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. राजाची पत्नी सोनम रघुवंशी हिने हत्येच्या कटामध्ये सहभागी असल्याची कबुली दिली आहे. मेघालय पोलिसांनी याबाबत माहिती दिली.
एसआयटी चौकशीदरम्यान सोनमने राजाच्या हत्येच्या कटामध्ये सहभागी असल्याची कबुली दिली आहे. बुधवारी, पोलिसांनी राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपींना शिलाँगमध्ये समोरसमोर आणले त्यावेळी समोर ठेवलेले पुरावे पाहून सोमनला रडू कोसळले. यावेळी इतर आरोपींनी हत्येची कबुली दिली, तर सोमन हिने आपण हत्येच्या कटामध्ये सहभागी असल्याचे कबूल केले.
दरम्यान, राजा रघुवंशी याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सोनमसह तिचा कथित प्रियकर राज कुशवाह, आनंद, आकाश राजपूत आणि विशाल उर्फ विकी ठाकूर यांना अटक केली आहे. आनंद, आकाश आणि विशालने राजाची हत्या केल्याची कबुली दिली आहे.
दरम्यान, सोनम रघुवंशी आणि राज कुशवाह यांचा एक फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात सोनम आणि राज एकमेकांसोबत आनंदी असल्याचे दिसते. विशेष म्हणजे राजच्या बहिणीने माध्यमांसमोर बोलताना आपल्याला न्याय हवा असल्याचे म्हटले आणि राज सोनमला दीदी म्हणत असल्याचेही म्हटले होते.