
डार्कनेट प्लॅटफॉर्म्स आणि क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून होणाऱया अवैध ड्रग तस्करीवर लक्ष ठेवण्यासाठी मल्टी एजन्सी सेंटरअंतर्गत विशेष टास्क फोर्सची स्थापना केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. ही टास्क फोर्स एजन्सींमध्ये समन्वय वाढवणे, ड्रग नेटवर्कचा मागोवा घेणे, तस्करीचे ट्रेंड्स विश्लेषण करणे आणि सीमापार तसेच आंतरराज्य ड्रग तस्करीविरुद्ध कारवाई मजबूत करण्यासाठी कार्य करणार आहे.
या टास्क फोर्सचे मुख्य लक्ष डार्कनेटवर कार्यरत प्लॅटफॉर्म्सवर आहे, जे ड्रग तस्करीसाठी वापरले जातात. याशिवाय क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून होणाऱया आर्थिक व्यवहारांवरही बारकाईने नजर ठेवली जाणार आहे, अशी माहिती आज लोकसभेत केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली आहे.
ड्रग तस्करविरुद्ध समन्वित कारवाईसाठी केंद्र सरकार आणि राज्य पातळीवर संयुक्त समन्वय समितीदेखील स्थापन करण्यात आली आहे. ही समिती मोठय़ा प्रमाणात ड्रग जप्तीच्या प्रकरणांच्या तपासावर देखरेख ठेवेल. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, भारतीय नौदल, कोस्ट गार्ड, सीमा सुरक्षा दल आणि राज्यांच्या अँटी-नार्कोटिक्स टास्क फोर्स
यांच्यासह संयुक्त ऑपरेशन राबवणार आहे.
या सहकार्यामुळे सीमावर्ती भागातून होणारी तस्करी रोखण्यात मोठी मदत होईल. ड्रग तस्करविरुद्ध लढण्यासाठी एनसीबीने इंटर-ऑपरेबल क्रिमिनल जस्टीस सिस्टीमच्या सहकार्यानं ‘नॅशनल इंटिग्रेटेड डेटाबेस ऑन अरेस्टेड नार्को-ऑफेंडर्स’ नावाचा केंद्रीकृत डिजिटल डेटाबेस विकसित केला आहे.
टास्क काय करणार?
ड्रग तस्करीविरोधात स्थापन करण्यात आलेली टास्क फोर्स ड्रग तस्करीशी संबंधित प्लॅटफॉर्म्सचं सतत निरीक्षण, विविध एजन्सी आणि एमएसी सदस्यांमध्ये ड्रग तस्करीच्या माहितीची देवाणघेवाण, ड्रग नेटवर्कची ओळख आणि अडथळा ओळखणे, तस्करीचे ट्रेंड्स, पद्धती आणि नोड्सची सतत नोंद आणि डेटाबेस अपडेट ठेवणे, संबंधित नियम आणि कायद्यांचा नियमित आढावा घेणे यासारखी कामे करणार आहे.




























































