
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील 100 संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. मतदानाच्या दिवशी शहर व उपनगरात साडेबारा हजारांहून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात असणार आहेत.
…15 पिस्तुले जप्त; सराईत तडीपार
निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरुद्ध कडक कारवाई करण्यात आली असून बेकायदा शस्त्र बाळगणाऱयांकडून 15 पिस्तुले, 15 काडतुसे आणि 29 तीक्ष्ण शस्त्रs जप्त करण्यात आली आहेत. तसेच शहरातील 313 सराईतांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहेत. आतापर्यंत पोलिसांनी 67 लाख रुपयांची रोकड जप्त केली असून दारूबंदी कायद्यान्वये 179 गुन्हे दाखल करून 1 कोटी 23 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मतदानाच्या दिवशी शहरात मोठय़ा प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या माध्यमातून शहरातील सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात येत असून, कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे
























































