चॅम्पियन्स ट्रॉफीला टी-20 चा तडका?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा वाद काही केल्या संपत नसल्यामुळे स्पर्धा आयोजनाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. एकीकडे हिंदुस्थानी क्रिकेट संघाने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानात खेळण्यास नकार दर्शविला आहे तर दुसरीकडे पाकिस्तान सशर्त हायब्रिड मॉडेल खेळविण्यासाठी राजी झाला आहे. तरीही आयोजनाबाबत कोणताही तोडगा निघत नसल्यामुळे वेळेअभावी वन डे फॉरमॅटमध्ये खेळविल्या जाणाऱया चॅम्पियन्स ट्रॉफीला टी-20 क्रिकेटचा तडका मारण्याची कल्पना समोर आली आहे. या फॉरमॅटमुळे स्पर्धेचे आयोजनही वेगात होईल आणि वेळही कमी लागेल, असे मत व्यक्त केले गेलेय.चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून आयसीसीने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या प्रयत्नांना अद्याप यश लाभलेले नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी रद्द करणे किंवा आयोजन पुढे ढकलणे हे आयसीसी आणि पीसीबीसाठी धोक्याची आणि तोटय़ाची घंटा आहे. त्यातच पीसीबीने आयोजनास नकार दर्शवल्यास त्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर त्यांना न्यायालयीन कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते. तसेच स्पर्धेच्या आयोजनाबाबत पीसीबीने नापसंती दर्शवत स्पर्धेतून अंग काढून घेतल्यास त्यांना जागतिक क्रिकेटशी पंगाही घ्यावा लागू शकतो. या स्थितीत चॅम्पियन्स ट्रॉफीशी संबंधित प्रायोजक आणि ब्रॉडकास्टर या स्पर्धेला टी-20 क्रिकेटमध्ये खेळविण्यासाठी आयसीसीवर दबाव घालू शकतात. स्पर्धा रद्द करण्यापेक्षा टी-20 चा पर्याय सुलभ आणि सोयिस्कर ठरेल, असे मत समोर आले आहे. जर आयोजनाचा वाद येत्या आठवडाभरात मिटला नाहीतर आयसीसीला टी-20 चा तडका देत कमी कालावधीत स्पर्धा आयोजित करता येऊ शकते. स्पर्धा विलंबामुळे होणारे नुकसान अब्जावधींमध्ये असल्यामुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजनासाठी या पर्यायाचाही अवलंब करू शकते.