पद्म पुरस्कारांसाठी 5 खेळाडूंची शिफारस; पॅरिस ऑलिम्पिकमधील 4 पदकवीर, जगज्जेत्या गुकेश यांच्या नावाचा समावेश

क्रीडा मंत्रालयाने पाच खेळाडूंच्या नावांची ‘पद्म’ पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. यामध्ये मनू भाकर, सरबजोत सिंह, स्वप्नील कुसाळे आणि अमन सहरावत या पॅरिस ऑलिम्पिकमधील पदकवीर आहेत, तर पाचवे नाव जागतिक बुद्धिबळ विजेता डी. गुकेश यांचे आहे.

मंत्रालयाने हे प्रस्ताव ‘पद्म’ पुरस्कार समितीकडे पाठवले आहेत. पद्म पुरस्कारांसाठी नामांकन 1 मे ते 15 सप्टेंबरदरम्यान करता येते. या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी 26 जानेवारीला (प्रजासत्ताक दिन) केली जाते. गेल्या वर्षी माजी हॉकी गोलरक्षक पी. आर. श्रीजेश यांना ‘पद्मभूषण’ आणि दिग्गज फिरकीपटू आर. अश्विन यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार देण्यात आला होता. ‘पद्म’ पुरस्कार समितीची नियुक्ती दरवर्षी पंतप्रधान करतात. या समितीचे अध्यक्ष पॅबिनेट सचिव असतात.

समितीत गृह मंत्रालयाचे सचिव, राष्ट्रपती भवनाचे सचिव आणि 4 ते 6 सदस्यांचा समावेश असतो. या समितीच्या शिफारशी पंतप्रधान आणि हिंदुस्थानचे राष्ट्रपती यांच्याकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवल्या जातात.

मनू-गुकेशसह 4 जणांना मिळाला होता ‘खेलरत्न’

सुमारे 8 महिन्यांपूर्वी 17 जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्टार नेमबाज मनू भाकर, जागतिक बुद्धिबळ विजेता डी. गुकेश, हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंह आणि पॅरा-अॅथलिट प्रवीण कुमार यांना ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारा’ने सन्मानित केले होते. 

नीरजश्रीजेश यांना आधीच मिळाले आहेतपद्मपुरस्कार

हिंदुस्थानने गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकूण 6 पदके जिंकली होती. यात 1 रौप्य आणि 5 कांस्य पदकांचा समावेश होता. यामध्ये भालाफेकपटू नीरज चोप्रा याला ‘पद्मश्री’, तर हॉकी संघाचा गोलरक्षक पी. आर. श्रीजेश यांला ‘पद्मभूषण’ पुरस्कार आधीच मिळाला आहे.