
गेल्या काही महीन्यांपुर्वी युटय़ूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. आता तिच्याविरोधात ठोस पुरावे सापडल्याचा दावा पोलिसांनी केला असून तिच्याविरोधात तब्बल 2 हजार 500 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. तीन महिन्यांच्या चौकशीनंतर सर्व पुरावे गोळा करून न्यायालयासमोर ठेवण्यात आले आहेत.
ज्योती मल्होत्रा ऊर्फ ज्योती राणी हिचे ‘ट्रव्हल विथ जो’ नावाचे युटय़ूब चॅनेल होते. तिला मे महिन्यात हिसार येथून पोलिसांनी अटक केली होती. ती पाकिस्तानी उच्चायुक्तालयात एहसान उर रहीम ऊर्फ दानिश याच्या संपर्कात होती असा पोलिसांचा आरोप आहे. ज्योती बराच काळ हेरगिरी करत होती. आयएसआय एजंट शाकीर, हसन अली आणि नासिर ढिल्लन यांच्या संपका&त होती.
ज्योतीने पाकिस्तान आणि चीनचा दौरा केला होता
ज्योती गेल्या वर्षी 17 एप्रिल रोजी पाकिस्तानला गेली होती. ती 15 मे रोजी हिंदुस्थानात परतली. त्यानंतर केवळ 25 दिवसांनी म्हणजेच 10 जून रोजी ज्योती चीनला गेली आणि जुलैपर्यंत तिथेच राहिली. त्यानंतर ती नेपाळला गेली, असा आरोप आहे. तसेच ज्योती कर्तारपूर कॉरिडॉरमार्गे पाकिस्तानला गेली तेव्हा तिने पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची कन्या मरियम नवाज यांची मुलाखत घेतली. त्यानंतर पहलगाम दहशतवादी हल्ल्यादरम्यान ती पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती, असा आरोप आहे.