दहावीचा भरघोस निकाल! राज्यातील 77 टक्के विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी तर 40 टक्के विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये

राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के इतका लागला आहे. या निकालाचे वैशिष्टय़ म्हणजे 15 लाख 68 हजार 977 विद्यार्थ्यांपैकी 15 लाख 21 हजार 3 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले असून यांपैकी तब्बल 6 लाख 50 हजार 779 विद्यार्थी (40 टक्के) डिस्टिंक्शनमध्ये (75 टक्क्यांपेक्षा जास्त गुण) आहेत, तर 5 लाख 70 हजार 27 विद्यार्थ्यांना (77 टक्के) प्रथम श्रेणी मिळाली आहे.

कला आणि क्रीडा कोटय़ातील सवलतीच्या गुणांमुळे 122 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजेच 100 टक्के गुणांची लॉटरी लागली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावात ऑफलाइन पद्धतीने दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेतच परीक्षा पार पडल्या. याचा परिणाम म्हणजे राज्यातील एकूण 22,921 शाळांपैकी 12,210 शाळांचा निकाल 100 टक्के आहे, तर 29 शाळांमधील एकही विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेला नसून या शाळांचा शून्य टक्के निकाल आहे.

परंपरेप्रमाणे कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक आहे. कोकणातील 99.27 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी 95.90 टक्के इतका लागला आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण सर्वाधिक असून या परीक्षेत 99.27 टक्के मुली तर 96.06 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. मागील वर्षाच्या निकालाची यंदाच्या निकालासोबत तुलना होते. मात्र 2021 मध्ये कोरोनामुळे लेखी परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापनाद्वारे दहावीचा निकाल घोषित करण्यात आला होता. त्यामुळे 2020 च्या निकालासोबत यंदाच्या निकालाची तुलना केली असता निकालात 1.64 टक्क्यांची वाढ झाली आहे. मार्च 2020 मध्ये 95.30 टक्के निकाल लागला होता.

निकालाची वैशिष्टय़े

कोकणचा निकाल 99.27 टक्के, 30,816 विद्यार्थ्यांपैकी 30,593 उत्तीर्ण.
एकूण 66 विषयांपैकी 24 विषयांचा निकाल 100 टक्के
पुनर्परीक्षार्थींचा निकाल 79.06 टक्के
मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल 1.90 टक्क्यांनी अधिक
8029 विद्यार्थ्यांपैकी 7579 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण
खासगी विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी 84.23
राज्यातील 1 लाख 64 हजार 256 विद्यार्थ्यांना कोटय़ांतील सवलतीचे गुण

100 टक्के गुणांचे विद्यार्थी

लातूर – 70
कोल्हापूर – 18
संभाजीनगर – 18
अमरावती – 8
पुणे – 5
मुंबई – 1
नाशिक – 1
कोकण – 1

शाळानिहाय निकाल

टक्के              शाळा
0                   29
1-10                1
20-30              4
30-40            18
40-50            38
50-60            41
60-70          123
70-80          321
80-90        1330
90-99.99   8801
100        12,210
राज्य – 96.94

विभागवार टक्केवारी…

कोकण – 99.27
कोल्हापूर – 98.50
लातूर – 97.27
नागपूर – 97.00
पुणे – 96.96
मुंबई – 96.94
अमरावती – 96.81
संभाजीनगर – 96.33
नाशिक – 95.90

21 जुलैपासून बारावी तर 27 जुलैपासून दहावीची फेरपरीक्षा

नापास विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टमध्ये फेरपरीक्षा घेण्यात येणार असून बारावीची फेरपरीक्षा 21 जुलै ते 12 ऑगस्ट तर दहावीची फेरपरीक्षा 27 जुलै ते 12 ऑगस्टदरम्यान होणार आहे. या परीक्षेसाठी बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. दहावीचे विद्यार्थी 20 जूनपासून ऑनलाइन परीक्षा अर्ज भरू शकतात.

मुंबई शहर, उपनगर पिछाडीवर

बारावीपाठोपाठ दहावीच्या परीक्षेतही मुंबई शहर आणि उपनगरांची ग्रामीण जिह्यांच्या तुलनेत सुमार कामगिरी राहिली आहे. मुंबई विभागाचा निकाल 96.94 टक्के इतका लागला असून दक्षिण मुंबईचा निकाल सर्वात कमी 96.30 टक्के लागला आहे.

मुंबई विभागातून 3 लाख 51 हजार 762 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 3 लाख 41 हजार 32 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यांपैकी 1 लाख 6 हजार 196 विद्यार्थ्यांना डिस्टिंक्शन मिळाले असून 1 लाख 40 हजार 378 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या 18,293 इतकी होती. यांपैकी 14, 681 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी 80.25 इतकी आहे.

निकाल दृष्टिक्षेपात…

100 टक्के गुण मिळालेले विद्यार्थी – 122
90 टक्क्यांच्या पुढील – 83,060
75 टक्क्यांच्या वर गुण – 6,50,779
प्रथम श्रेणी मिळालेले – 5,70,027

आवडत्या क्षेत्रातील करीअरसाठी मेहनतीची तयारी ठेवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच या विद्यार्थ्यांना पुढील उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छादेखील दिल्या आहेत. ‘शिक्षण प्रवासातील एक टप्पा आपण यशस्वीपणे पार केला आहे. या यशासाठी आपले सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन! आता पुढील शैक्षणिक वाटचालीत करीअर म्हणून वेगवेगळी क्षेत्रे खुणावत असतील. त्यामध्ये उज्ज्वल यश मिळविण्यासाठी प्रयत्नपूर्वक आणि डोळसपणे पावले टाका. अभ्यासात मेहनतीची तयारी ठेवा, यश निश्चितच मिळेल. त्यासाठी हार्दिक शुभेच्छा!’ असेही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.