लाडक्या बहिणींना घरबसल्या पैसे; एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय का? सरकारच्या अनागोंदीवर एसटी कर्मचारी; अधिकाऱ्यांचा संताप

st bus
फाईल फोटो

महाराष्ट्राची ‘जीवनवाहिनी’ असलेल्या एसटीच्या 86 हजार कर्मचाऱयांच्या पगाराला कात्री लावण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयाविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. निवडणुकीत मते मिळवण्यासाठी लाडक्या बहिणींना घरबसल्या पैसे द्यायला सुरुवात केली, मग एसटी कर्मचाऱयांना पगार देतानाच तिजोरीत खडखडाट कसा झाला? एसटी कर्मचाऱयांच्या मेहनतीच्या पैशांना कात्री लावण्याचा अन्याय का केला? असे सवाल राज्यभरातील एसटी कर्मचारी-अधिकाऱयांनी गुरुवारी उपस्थित केले आणि सरकारविरोधात संताप व्यक्त केला.

सत्तेत येताच महायुती सरकारने एसटी महामंडळाच्या विकासाचे स्वप्न दाखवले. प्रवासी आणि कर्मचाऱयांच्या हितासाठी योजनांची घोषणाबाजी केली, मात्र त्याला काही दिवस उलटत नाही तोच एसटी कर्मचाऱयांच्या अर्ध्या पगाराला कात्री लावण्याचा विश्वासघातकी निर्णय घेण्यात आला. महायुती सरकारने महामंडळाला पुरेसा निधीच दिला नाही. त्यामुळे ही वेळ आल्याने गुरुवारी सरकारविरोधात एसटी कर्मचाऱयांनी तीव्र संतापाच्या भावना व्यक्त केल्या. एकीकडे लाडक्या बहिणींच्या कल्याणाच्या गोष्टी करणाऱया सरकारने एसटी महामंडळातील महिला कर्मचाऱयांवर अन्याय केला. त्यामुळे महिला कर्मचाऱयांमध्ये सरकारप्रति असंतोष निर्माण झाला आहे.

तातडीने उर्वरित पगार द्या अन्यथा काम बंद करू!

एसटी कर्मचारी आधीच कमी पगारात काम करीत आहेत. कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी अनेक कर्मचाऱयांना कर्जे घ्यावी लागली आहेत. त्या कर्जांचा हप्ता दर महिन्याला द्यावा लागतो. अशातच सरकारने पगार विलंबाने दिला आणि त्यात अर्ध्या पगाराला कात्री लावली. त्यामुळे आमच्यापुढे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने तातडीने उर्वरित 44 टक्के पगार द्यावा, अन्यथा आम्ही कामबंद आंदोलन करू, असा इशारा एसटी कर्मचाऱयांनी दिला आहे.

आज सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने

एसटी कर्मचाऱयांना मार्चचा अर्धाच पगार दिल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करणार आहेत. या निदर्शनांत एसटीचे वाहक-चालक व इतर कर्मचारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष धर्मपाल ताकसांडे, सरचिटणीस सुनील निरभवणे यांनी दिली.

उर्वरित पगार मंगळवारी?

महायुती सरकारविरोधात राज्यभरातील एसटी कर्मचाऱयांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे हादरलेल्या सरकारने कर्मचाऱयांचा उर्वरित पगार देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. एसटी कर्मचारी, अधिकाऱयांचा उर्वरित 44 टक्के पगार येत्या मंगळवारपर्यंत देण्यात येईल, असे राज्याचे वित्त सचिव ओमप्रकाश गुप्ता यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेअंती स्पष्ट केल्याचे समजते.

महिला कर्मचाऱयांना अश्रू झाले अनावर

अनेक महिला एसटी कर्मचाऱयांना अश्रू अनावर झाले. सरकार घरी बसणाऱया लाडक्या बहिणींना दरमहिन्याला पैसे देत आहे, मग आमच्यासारख्या दिवसरात्र राबणाऱया महिला कर्मचाऱयांच्या मेहनतीचे पैसे का कापले जात आहेत? सरकारसाठी आम्ही लाडक्या बहिणी नाहीत का? आम्हाला आधीच तुटपुंजा पगार आहे. त्या पगारालाही सरकारने कात्री लावली. एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच ही वेळ आली आहे. हा अन्याय आम्हाला असह्य होत आहे, अशी प्रतिक्रिया सोलापूर येथील महिला कर्मचाऱयांनी दिली.