गोव्यात लईराई देवीच्या यात्रेत चेंगराचेंगरी; 7 भाविकांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी

गोव्यातील शिरगाव येथे लईराई देवीच्या यात्रेमध्ये शनिवारी पहाटे चेंगराचेंगरीची घटना घडली. यात 7 भाविकांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ गोवा मेडिकल कॉलेज आणि म्हापसा येथील उत्तर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची संख्या जास्त असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरगाव येथील लईराई देवीच्या पारंपारिक यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक जमले होते. गर्दीमुळे गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे भाविक एकमेकांच्या अंगावर कोसळले आणि 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावत यांनी उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन जखमींची चौकशी केली. तसेच बिचोलिम रुग्णालयातही त्यांनी जखमींची चौकशी करत त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्याचे निर्देश दिले.

बिचोलिम तालुक्यात येणाऱ्या शिरगाव येथे लईराई देवीचे मंदिर आहे. लईराई देवीचे हे मंदिर स्थानिक लोकांसाठी श्रद्धेचे स्थान आहे. येथे दरवर्षी चैत्र महिन्यामध्ये यात्रा भरते. त्याला लईराई देवीची यात्रा किंवा शिरगावची यात्रा असेही म्हणतात. अनेक दिवस ही यात्रा चालते. या यात्रोत्सवादरम्यान देवीची भव्य मिरवणूक काढली जाते.

यात्रोत्सव काळामध्ये धार्मिक विधीमध्ये सहभागी होण्यासाठी आणि देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी हजारो भाविक या काळात मंदिर परिसरात जमतात. शुक्रवारी या यात्रेला सुरुवात झाली होती. मात्र शनिवारी पहाटे चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली आणि यात्रोत्सवाला गालबोट लागले.