मी वाईट नाही…. तुम्हाला फक्त मी आवडत नाही…. कुणाल कामराने लक्षवेधी टी शर्ट घालून नोंदवली साक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ‘ठाणे की रिक्षा’ हे गाणं करणारा स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा आज विधिमंडळाच्या विशेषाधिकार समितीसमोर साक्ष नोंदविण्यासाठी उपस्थित झाला होता I am not bad, you just don’t like me असे टी-शर्ट घालून आलेल्या कामराने एकनाथ शिंदेंवरील गाणे व्यवसायाचा आणि विनोद करणे हा व्यवसायाचा भाग असल्याचे स्पष्टीकरण दिले.

विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांच्यासमोर हक्कभंग आणणारे भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि कामरा यांच्यात समोरासमोर प्रश्नोत्तरे झाली. गाणं करून आपण कोणतीही चूक केलेली नसल्याचे ठामपणे त्याने सांगितले. हे गाणे हा आपल्या व्यावसायिक क्षेत्राचा भाग असून त्यातून व्यंग मांडण्यात आल्याचे त्याने आपल्या साक्षीत सांगितले. टी-शर्टवर लिहिलेल्या मजकूर याविषयी प्रसाद लाड यांनी विचारले असता, टीशर्टवर काय लिहिलेय हे वाचलेले नाही. आपण सुनावणीसाठी आलो असल्याचा युक्तिवाद कुणाल कामरा याने केला.

कुणाल कामराला बिनशर्त माफी मागण्यास सांगण्यात आले असता त्याने याला आपल्या वकिलामार्फत उत्तर देणार असल्याचे स्पष्ट केले. आता समिती सादर केलेल्या कागदपत्रांचा आढावा घेऊन कमरा यांचे कृत्य विशेषाधिकार भंगात मोडते की ते व्यावसायिक व्यंगात्मक अभिव्यक्तीचा भाग आहे, यावर अंतिम निर्णय घेणार असल्याचे प्रसाद लाड म्हणाले.