
राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या पूर्वी शासन निर्णय (जीआर) जारी करण्याचे महायुती सरकारने रेकॉर्डच केला आहे. मागील चार दिवसांत तब्बल 573 शासन निर्णय जारी करण्यात आले. या माध्यमातून सत्ताधारी मंत्री आणि आमदारांच्या मतदारसंघासाठी लाखो कोटींचा निधी विविध माध्यमातून मंजूर केला आहे.
पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्रालयाने जळगाव जिह्यात राष्ट्रीय जलजीवन पाणीपुरवठा योजनेसाठी हजारो कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी दिली आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील काही दिवसांत लागू होईल. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे मंत्री आणि आमदारांच्या मतदारसंघांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून निधीची खैरात करण्याचे काम सुरू आहे.
– आजच्या एका दिवसात 103 शासन निर्णय जारी करण्यात आले. सर्वाधिक म्हणजे 177 जीआर जारी करण्यात आले. यामध्ये महामंडळाच्या अध्यक्ष पदाच्या नियुक्त्या, अधिकाऱयांच्या बदल्या, नियुक्त्या करण्यात आल्या. आपल्या सोयीच्या विभागातील पदांना मुदतवाढ देण्यात आली.
जळगाववर सर्वाधिक बरसात
सर्वाधिक निधीची बरसात जळगाव जिह्यावर झाली आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या माध्यमातून जळगावमधील राष्ट्रीय जलजीवन आणि पाणीपुरवठा योजनेच्या सुधारित अंदाजपत्रकाला मंजुरी दिल्याचे शासन निर्णय जारी झाले आहे. या जिह्यावर अक्षरशः हजारो कोटी रुपयांची बरसात झाली आहे. जळगावमधील किमान अठरा तालुक्यांतील विविध अठरा ग्रामपंचायतीमध्ये पाणीपुरवठा योजनेसाठी लाखो रुपयांचा निधी दिला आहे. प्रत्येक गावात कमाल चार कोटी रुपयांपासून किमान 28 लाख रुपयांपर्यंतच्या निधीच्या सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी दिली आहे. त्याशिवाय विविध राजकीय नेत्यांशी संबंधित सहकारी सूत गिरण्यांना अर्थसहाय्य करण्यात आले आहे.