
पुण्याच्या सरकारी मनोरुग्णालयात दोन रुग्णांमध्ये झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला. याची गंभीर दखल घेत या मृत्यूची नुकसानभरपाई राज्य शासनाला द्यावी लागेल, असा निर्वाळा हायकोर्टाने दिला आहे. यावरील पुढील सुनावणी 26 फेब्रुवारीला होणार आहे.
न्या. मनिष पितळे व न्या. श्रीराम शिरसाट यांच्या खंडपीठाने हा निर्वाळा दिला. संबंधित रुग्णालयात पुरेसे मनुष्यबळ असते तर हाणामारीची घटना घडलीच नसती. त्यामुळे राज्य शासनाला या रुग्णाच्या पत्नीला व मुलांना नुकसानभरपाई द्यावीच लागेल. भरपाईची रक्कम नेमकी किती असेल हे पुढील सुनावणीत निश्चित केले जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
राज्य शासन असंवेदनशील
क्षुल्लक कारणावरून दोन रुग्णांमध्ये हाणामारी झाली होती. त्यात झालेल्या मृत्यूसाठी कुटुंबाला भरपाई देता येणार नाही. तरीदेखील आम्ही या रुग्णाच्या कुटुंबाला एक लाख रुपये दिले आहेत, असा दावा राज्य शासन केला. त्यावर न्यायालय संतप्त झाले. या दाव्यावरून स्पष्ट होते की राज्य शासन असंवेदनशील आहे. एक लाखाच्या तुटपुंज्या रकमेने या कुटुंबाचे नुकसान भरून निघणार नाही. त्यांना पुरेशी भरपाई मिळायलाच हवी, असे न्यायालयाने राज्य शासनाला फटकारले.























































