महाराष्ट्राचे कलाभूषण हरपले, महान शिल्पकार राम सुतार यांचे निधन

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशाअशी महाराष्ट्राची ओळख आहे. याच मातीदगडांतून भव्य शिल्पे साकारून आपल्या उत्तुंग प्रतिभेचे दर्शन जगाला घडवणारे महान शिल्पकार राम सुतार आज कालवश झाले. ‘देखणे ते हात ज्याला निर्मितीचे डोहळेम्हणत आपल्या शतायुषी जीवनात त्यांनी अखंडपणे सर्जनशीलतेची कास धरली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचे कलाभूषण हरपले.

राम सुतार यांनी नोएडा येथील त्यांच्या निवासस्थानी मध्यरात्री दीडच्या सुमारास वयाच्या 101 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने हिंदुस्थानी कला, संस्कृती आणि कलेच्या क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. गेल्याच महिन्यात त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ने सन्मानित करण्यात आले होते.

या वर्षी 19 फेब्रुवारी रोजी राम सुतार यांनी वयाची शंभरी पूर्ण केली होती. गेले काही महिने ते वयोमानानुसार होणाऱया आजारांचा सामना करत होते. मात्र तरीही त्यांची कलासाधना थांबली नव्हती. ते दिल्ली येथे वास्तव्यास होते, तर नोएडातील ‘राम सुतार कला संचालनालया’चे संचालक होते. त्यांचा मुलगा अनिल सुतार हे त्यांचा शिल्पकलेचा वारसा पुढे नेत आहेत. अलीकडेच अनावरण झालेला मालवण- राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असो किंवा अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवरायांचा पुतळा, इंदू मिल स्मारकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, पिंपरी-चिंचवड येथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा अशा महत्त्वाच्या प्रकल्पांचे काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होते. त्यांच्या पार्थिवावर गुरुग्राम येथे अंत्यसंस्कार झाले. त्याआधी नोएडा सेक्टर-19 येथील त्यांच्या निवासस्थानातून त्यांची अंत्ययात्रा निघाली.  कला क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना 1999 मध्ये ‘पद्मश्री’ आणि 2016 मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राम सुतार सात-आठ वर्षांचे असताना महात्मा गांधी गोंदूरला आले होते. त्यांच्या उपस्थितीत विदेशी वस्तू जाळण्याचा कार्यक्रम होता. तेथून सुतार यांचा महात्मा गांधी यांच्याशी नकळत जोडला गेलेला ऋणानुबंध त्यांच्या शिल्पकलेला चालना देणारा ठरला. ते विनोबा भावे यांच्या नित्य संपर्कात होते. मूर्तिकौशल्य हेरून चित्रकलेच्या शिक्षकांनी 1948 साली त्यांना गांधी यांचा पुतळा बनवण्यास सांगितले. त्या पुतळ्यासाठी शंभर रुपयांचे बक्षीस मिळाले. सुतार यांनी नंतर शेजारच्या गावात तशीच गांधी मूर्ती बनवून दिली. तेथे त्यांना तीनशे रुपये मिळाले. महात्मा गांधी यांचा आशीर्वाद लाभला असेच त्यांना वाटले. तेव्हापासून महात्मा गांधी यांचा पुतळा ही त्यांची खासियत बनून गेला.

महात्मा गांधी इन मेडिटेशन

महात्मा गांधी इन मेडिटेशन हे त्यांचे अत्यंत गाजलेले शिल्प होय. 17 फूट उंचीच्या या शिल्पाच्या प्रतिकृती सरकारने महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने रशिया, इंग्लंड, मलेशिया, फ्रान्स, इटली, अर्जेंटिना, बार्बाडोस आदी देशांना भेटीदाखल पाठविल्या. हे मूळ शिल्प संसदभवनात विराजमान आहे. 1972 मध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार महोत्सव आशियासाठी या शिल्पाकृतीची मोठी आवृत्ती तयार करण्यात आली. नंतर तिची प्रगती मैदान, दिल्ली येथे प्रतिष्ठापना करण्यात आली.

कलातपस्वी

कलाक्षेत्रातील तपस्वी व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले. आयुष्यभर त्यांनी कलेची साधना केली. त्यांचे काम नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. राम सुतार यांच्या शिल्पकलेतून प्रेरणा घेऊन अनेक कलावंत घडले. त्यांनी होतकरू, नवोदितांचे नेहमीच कौतुक केले. कलावंत म्हणून समाजाकडून, सरकारकडून त्यांना मानसन्मान मिळाले. राम सुतार यांनी साकारलेली अनेक शिल्पे म्हणजे कलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. संसदेच्या प्रांगणातील महात्मा गांधींचे शिल्प त्यांनी उमेदीच्या काळात साकारले होते. पॅचवर्क काम असूनही त्यात सुंदरता दिसून येते. हे शिल्प माझे आवडते आहे.

भगवान रामपुरे, शिल्पकार