
शेअर बाजारात गुरुवारी मोठी उसळी पाहायला मिळाली. सेन्सेक्सने तब्बल 400 अंकांची वाढ नोंदवत थेट 77145.46 पर्यंत मजल मारली. सेन्सेक्सपाठोपाठ निफ्टीनेही 0.51 टक्क्यांची वाढ नोंदवली. गुरुवारी सकाळी 118.35 अंकांनी वाढून निफ्टी थेट 23441.30 पर्यंत पोहोचला. शेअर बाजार उघडल्यानंतर निफ्टीने नोंदवलेली ही वाढ अवघ्या काही मिनिटांत थेट 23481 पर्यंत पोहोचली. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. अमेरिकेच्या फेडरल बँकेने आपले व्याजदर स्थिर ठेवले आहेत, यामुळे हिंदुस्थानी शेअर बाजारात सकारात्मक पडसाद उमटले.
n सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 28 समभागांमध्ये वाढ तर 2 समभागांमध्ये घट दिसून आली. खासकरून ऑटो आणि एनर्जी शेअर्समध्ये अधिक तेजी पाहायला मिळाली.
n विदेशातील महागाई दरात मोठी घसरण झाली असून देशातील किरकोळ महागाई मे महिन्यात कमी होऊन 4.75 टक्क्यांवर आली आहे. गेल्या 12 महिन्यांतील ही नीचांकी पातळी आहे. या गोष्टींमुळे बाजारात तेजी आल्याचे म्हटले जातेय.