Budget 206 – एक घोषणा अन् शेअर बाजार भूईसपाट; जाणून घ्या शेअर बाजाराला दणका देणारी घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रविवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेअर बाजाराबाबत करण्यात आलेल्या एका घोषणेमुळे शेअर बाजारात हाहाकार उडाला असून शेअर बाजार भूईसपाट झाला आहे. अर्थसंकल्पात शेअर बाजारातील फ्यूचर आणि ऑप्शन ट्रेडिंगवरील एसटीटी करात वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पातही तो वाढवण्यात आला होता. यावेळी तो ०.१ टक्क्यांवरून ०.१५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. या घोषणेनंतर, शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे.

अर्थसंकल्पातील या घोषणेनंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 2000 तर निफ्टी 500 अंकांनी घसरला होता. मात्र, त्यानंतर काही शेअरमुळे बाजार सावरत असल्याचे दिसत आहे. 12.45 वाजण्याच्या सुमारास 750 अंकांनी घसरून 81,488.95 वर व्यवहार करत होता. तर निफ्टी 276.60 अंकांनी घसरून 25,180 वर व्यवहार करत आहे. या घोषणेमुळे बँकिंग आणि शेअर बाजाराशी संबंधित शेअर्सवर मोठा दबाव आहे. वेदांत, हिंदुस्तान झिंक आणि हिंदुस्तान कॉपरमध्ये लक्षणीय घसरण दिसून येत आहे.

शेअर मार्केटमध्ये कोणत्याही मालमत्तेची खरेदी आणि विक्री एसटीटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यवहार कराच्या अधीन आहे. गेल्या वेळीप्रमाणेच एसटीटी पुन्हा एकदा वाढविण्यात आला आहे. यावेळी, एफ अँड ओ मध्ये कोणत्याही प्रीमियमची खरेदी आणि विक्री करण्यासाठी एसटीटी वाढविण्यात आला आहे.

अर्थसंकल्पात शेअर बाजाराबाबत एक विशेष घोषणा करण्यात आली आहे. पीआयओना आता भारतीय बाजारात गुंतवणूक करण्यास मान्यता देण्यात आली आहे, म्हणजेच परदेशात राहणारे भारतीय वंशाचे व्यक्ती देखील भारतीय बाजारात गुंतवणूक करू शकतात. या मोठ्या घोषणेनंतर, परदेशी गुंतवणूकदार देशात येण्याची अपेक्षा आहे. ऑटो, फार्मा, एफएमसीजी वगळता सर्व क्षेत्रे सुमारे १% ने घसरली आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसारख्या क्षेत्रांवरही दबाव आहे.