
बांगलादेशात जे काही घडत आहे त्याबद्दल जर चुकीच्या बातम्या पसरवल्या तर वृत्तपत्रे किंवा टीव्ही मीडिया हाऊसला टाळे लावू, असा इशारा बांगलादेश सरकारने प्रसारमाध्यमांना दिला आहे. बांगलादेशबद्दल जगभरात चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बांगलादेश सरकारने म्हटले आहे.
हंगामी सरकारच्या गृह विभागाचे सल्लागार सेवानिवृत्त ब्रिगेडियर जनरल एम. सखावत हुसैन यांनी राजारबाग सेंट्रल पोलीस रुग्णालयात जाऊन जखमी पोलिसांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली. त्या वेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. जेव्हा मीडिया सत्य समोर ठेवत नाही तेव्हा संपूर्ण राष्ट्र डळमळीत होते, असे ते म्हणाले. टॉक शोमध्ये ठोस चर्चाच होत नाही. त्यामुळे मीडिया योग्य माहिती देण्यापासून अपयशी ठरते, असेही त्यांनी नमूद केले.
11 घुसखोर बांगलादेशींना सीमेवर पकडले
पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मेघालयातील आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारतात घुसखोरीचा प्रयत्न करताना अकरा बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाने रविवारी दिली. यातील प्रत्येकी दोन जणांना पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा सीमेवरून पकडण्यात आले आहे तर सात जणांना मेघालय सीमेवरून पकडण्यात आले आहे.