कुत्र्यांना रस्त्यावर नाही तर स्वतःच्या घरातच खायला द्या; सर्वोच्च न्यायालयाने नोएडाच्या एका व्यक्तीला फटकारले

भटक्या कुत्र्यांची समस्या राज्यासह देशभरातही गंभीर रुप धारण करत आहे. काहीजण भटक्या कुत्र्यांना रसत्यावरच खायला देतात. त्यामुळे अस्वच्छता आणि रोगराई पसरण्याचा धोका असतो. तसेच भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. तर काही लहान मुलांचा बळीही गेला आहे. नोएडातील भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर खायला देण्याचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचले आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी याचिकाकर्त्याला कठोर शब्दांत फटकारले आहे. तुम्ही भटक्या कुत्र्यांना तुमच्या घरात का खायला घालत नाही?, असा सवाल न्यायालयाने याचिकाकर्त्यांना केला. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली.

खंडपीठाने म्हटले की, आपण प्रत्येक रस्ता प्राणीप्रेमींसाठी सोडावा का? सर्वत्र प्राण्यांसाठी जागा आहे, माणसांसाठी नाही? तुम्हाला कोणीही अडवत नाही, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्यांना तुमच्या घरात खायला घालू शकता. ही याचिका मार्च 2025 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाशी संबंधित होती. याचिकाकर्त्याच्या वकिलाने म्हटले आहे की, प्राणी जन्म नियंत्रण नियम, 2023 अंतर्गत काम करत असताना, त्यांना खायला घालताना त्यांचा छळ केला जात आहे. वकिलाने असाही युक्तिवाद केला की नियम 20 नुसार, स्थानिक संस्था किंवा निवासी कल्याणकारी संघटनेने अशा प्राण्यांना खायला घालण्याची व्यवस्था करावी.

यावर न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सुचवले की, तुम्ही भटक्या कुत्र्यांना तुमच्या घरात एक निवारा उघडा आणि तेथील सर्व कुत्र्यांना खायला घाला. याचिकाकर्त्याच्या वकिलाने सांगितले की, अशी ठिकाणे ग्रेटर नोएडामध्ये बांधली जात आहेत, परंतु नोएडामध्ये अशा सोय नाही. यावर न्यायालयाने म्हटले, सकाळी सायकल चालवा आणि काय होते ते पहा. सकाळी फिरायला जाणाऱ्यांनाही भटक्या कुत्र्यांमुळे धोका आहे. तसेच सायकल आणि दुचाकीस्वारांनाही जास्त धोका आहे. यानंतर, न्यायालयाने ही याचिका दुसऱ्या प्रलंबित खटल्याशी जोडली आहे.