एल्फिन्स्टन पूल पाडण्याआधी पादचारी, रहिवाशांचे प्रश्न सोडवा; शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या प्रशासनाला सक्त सूचना

एल्फिन्स्टन पूल पाडण्याआधी पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी पर्यायी पुलाचे काम पूर्ण करा, तसेच पुलाच्या कामामुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांचे पुनर्वसन करा, अशा सक्त सूचना शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी प्रशासनाला दिल्या. पादचाऱ्यांसाठी पर्यायी व्यवस्था तसेच स्थानिक रहिवाशांचे पुनर्वसन केल्याशिवाय एल्फिन्स्टन पूल पाडू देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

वरळी-शिवडी कनेक्टरसाठी एल्फिन्स्टन पुलाची पुनर्बांधणी केली जाणार आहे. त्यासाठी पावसाळय़ाआधी पूल पाडण्याच्या दृष्टीने प्रशासन पातळीवर हालचाली सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर आमदार अजय चौधरी यांनी एल्फिन्स्टन पुलाच्या परिसराची सोमवारी  पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई महापालिका, मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासन, वाहतूक पोलीस आदी विभागांतील वरिष्ठ अधिकारी होते. एल्फिन्स्टन पूल पाडल्यानंतर पादचाऱ्यांची प्रचंड गैरसोय होणार आहे. प्रभादेवी स्थानकात असलेल्या पादचारी पुलाचे काम अर्धवट स्थितीत ठेवलेले आहे. ते काम सर्वात आधी पूर्ण करावे, परळ परिसरात प्रमुख रुग्णालये असल्याने पादचारी पुलाच्या दोन्ही बाजूला रुग्णवाहिका तैनात ठेवावी, तसेच पुलाच्या कामामुळे बाधित होणाऱ्या इमारतींतील रहिवाशांचे आधी पुनर्वसन करावे, या मागण्यांकडे  आमदार अजय चौधरी यांनी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

एल्फिन्स्टन पूल तोडण्यापूर्वी लोकांची येण्या-जाण्याची व्यवस्था कशी करता येईल, यादृष्टीने आमदार अजय चौधरी व उपस्थित अधिकाऱ्यांनी पाहणी केली. याचवेळी पादचारी पुलाचे काम व स्थानिक रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत एल्फिन्स्टन पूल पाडू देणार नाही, असा इशारा आमदार अजय चौधरी यांनी दिला.