
‘‘एक खंबीर नेता व माझ्या मंत्रिमंडळातील उमदा सहकारी गमावला,’’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार हे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री होते. अत्यंत शिस्तप्रिय, आपल्या खात्यावर वचक व अर्थ विभागाचा अभ्यास असणारे ते नेते होते. एक उत्तम सहकारी म्हणून त्यांचे माझे विशेष नाते जमले. अजित पवार हे दिलखुलास होते. मनात येईल ते बोलायचे. ते दीर्घद्वेषी नव्हते. राजकारणात त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला तरी त्यांनी संबंध तुटू दिले नाहीत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्यांच्या जाण्याने राज्यातील नेतृत्वात पोकळी निर्माण झाल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रात ते ‘दादा’ म्हणून लोकप्रिय होते. ते असे अकाली जातील असे वाटले नव्हते. कार्यकर्त्यांना जपणारा नेता म्हणून ते परिचित होते. ते सर्वार्थाने ‘दादा’ होते. दादांना माझ्यातर्फे, ‘ठाकरे’ व शिवसेना परिवारातर्फे श्रद्धांजली!





























































