
जनसुरक्षा विधेयक आणून विरोधकांना नक्षलवादी ठरवण्याचे पाप महायुती सरकार करतेय. पाशवी बहुमताच्या जोरावर सरकार हे विधेयक आणू पाहत असेल तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्याला कडवा विरोध करू. हिंदी सक्ती तोडून मोडून टाकलीच आहे. सभागृहात बहुमत नसले तरी रस्त्यावर सत्ता विरोधकांचीच आहे हे लक्षात ठेवा, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज कडाडले.
महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 रद्द करा या मागणीसाठी आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन व अन्य आंदोलकांची आज उद्धव ठाकरे यांनी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. सरकारविरुद्ध आंदोलन करणारे पक्ष आणि संघटनांना नक्षलवादी ठरवणारे हे विधेयक आहे. त्याविरोधात खांद्याला खांदा लावून रस्त्यावरची लढाई लढावी लागेल. भारतीय जनता पक्ष सत्तांध झाला असेल तर त्याच्यावर अंकुश आणावाच लागेल, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. जनसुरक्षा विधेयकाच्या आडून विरोधकांना नक्षलवादी ठरवून तुरुंगात टाकण्याची स्वप्ने बघत असाल तर आधी पहलगाम हल्ल्यातील अतिरेकी गेले कुठे याचे उत्तर द्या, असे उद्धव ठाकरे यांनी सरकारला सुनावले. याप्रसंगी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, आमदार भास्कर जाधव, अनिल परब, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह शिवसेनेचे विधिमंडळातील सर्व आमदार, शेकापचे जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव उपस्थित होते.
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर विविध प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामीण रस्ते विकास कंत्राटी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी रामदास बर्डे आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. उद्धव ठाकरे यांनी यावेळी त्यांचीही भेट घेऊन विचारपूस केली. बर्डे यांच्या कुटुंबीयांशीही त्यांनी संवाद साधला. बर्डे यांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी उपोषण मागे घ्यावे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.
शेतकऱ्यांनाही नीच भाजपवाल्यांनी नक्षलवादी म्हटले होते
2017-18 मध्ये नाशिकमधून हजारो शेतकरी आंदोलनासाठी मुंबईत येत होते. त्यांच्या हातात लाल बावटा होता. त्यांच्या मदतीसाठी शिवसेनेचे नेते आपण ठाण्याच्या सीमेवर पाठवले होते. लाल बावटावाल्यांच्या मदतीला उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक कसे असे त्यावेळी अनेकजण म्हणाले होते; पण गोरगरीब शेतकरी अनवाणी मुंबईत येतोय, पाय रक्तबंबाळ झाले होते. त्या रक्ताचा रंगही लाल होता आणि त्याच्याशी शिवसेनेशी बांधिलकी होती, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनाही नक्षलवादी म्हणून संबोधण्याचे पाप नीच भाजपवाल्यांनी केले होते, असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.