जय श्रीरामचा नारा दिल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने बदडले

वर्गात जय श्रीरामचा नारा दिल्याने शिक्षकाने विद्यार्थ्याला जबर मारहाण केल्याची घटना आज पेण तालुक्यातील जोहे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये घडली आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्याने घडलेला प्रकार घरी सांगितल्यानंतर संतप्त पालकांसह स्थानिक नागरिकांनी शाळेवर धडक देत मारकुट्या शिक्षकाला जाब विचारला. यावेळी तंतरलेल्या शिक्षकाने माफी मागितली. याप्रकरणी पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेतले आहे.

जोहे येथे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज आहे. आठवीत शिकणाऱ्या कळवे गावातील विद्यार्थी आयुष पाटील या विद्यार्थ्याने शाळेतच जय श्रीरामचा नारा दिला. त्यावेळी मोमीन नामक शिक्षकाने त्याला मारहाण केली. विद्यार्थ्यांनी ही घटना आपल्या पालकांना सांगितली. या घटनेच्या निषेधार्थ कळवे गावातील नागरिक जाब विचारण्यासाठी जोहे हायस्कूल येथे गेले. ग्रामस्थांचा रोष पाहून मोमीन नामक शिक्षकाची पाचावर धारण बसली.