उपनिरीक्षक संदीप शिवतरे यांचा ऑनड्युटी मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पोलीस उपनिरीक्षक संदीप शिवतरे (42) यांचा आज पहाटे ऑनडय़ुटी असताना हृदयविकाराने मृत्यू झाला. ते शीव पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

उपनिरीक्षक संदीप शिवतरे हे मंगळवारी रात्रपाळीला आऊट एडीआरकरिता नेमणुकीला होते. शीव इस्पितळात येणाऱ्या मृतदेहांचा पंचनामा, त्याची माहिती घेण्याचे काम त्यांच्याकडे होते. मंगळवारी रात्री एका मृतदेहाचा पंचनामा करून ते पोलीस ठाण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा कॉल आल्याने ते पहाटे 5 वाजता इस्पितळात जाणार होते. पण त्याआधीच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे शीव इस्पितळात नेऊन त्यांची आवश्यक चाचणी सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले. शिवतरे हे वरळी पोलीस वसाहतीत राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली असा परिवार आहे. अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह त्यांच्या मूळ गावी नेण्यात झाला. शिवतरे यांच्या अशा मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.