पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात हिमाचलचा जवान शहीद, दोन महिन्यांनी होणार होते निवृत्त

जम्मूतील राजौरी येथे शुक्रवारी रात्री उशिरा पाकिस्तानने केलेल्या अंदाधुंद गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देताना हिमाचल प्रदेशातील जवान शहीद झाला. हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील शाहपूरचे रहिवासी सुभेदार मेजर पवन कुमार यांना पाकिस्तानी सैन्याशी लढताना वीरमरण आले. जम्मू आणि कश्मीरमधील राजौरी येथे सुभेदार मेजर पवन कुमार तैनात होते.

शुक्रवारी रात्री पाकिस्तानी सैन्याने अचानक अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्याला हिंदुस्थानी सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत पवन कुमार गंभीर जखमी झाले, त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दोन महिन्यांनी होणार होते निवृत्त

पवन कुमार 25 पंजाब रेजिमेंटमध्ये तैनात होते. ते दोन महिन्यांनी निवृत्त होणार होते. त्यापूर्वीच ते शहीद झाले. पवन कुमार यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, पत्नी आणि त्यांचे आई-वडील असा परिवार आहे. वडील गर्ज सिंह हेदेखील सैन्यातून हवालदार म्हणून निवृत्त झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

पाकिस्तानच्या गोळीबारात अधिकाऱ्याचा मृत्यू

पाकिस्तानी सैन्याने हिंदुस्थानातील नागरी वस्त्यांवर केलेल्या हल्ल्यात प्रशासकीय अधिकाऱयासह पाच नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. राजौरी येथे झालेल्या तोफगोळ्यांच्या माऱयात जम्मू-कश्मीरचे अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राज कुमार थापा यांचा मृत्यू झाला. राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या वृत्ताला दुजोरा देत शोक व्यक्त केला आहे.