सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात चितळ, सांबरांचे यशस्वी स्थलांतर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील वाघांच्या भक्ष्यासाठी तृणभक्षक प्राण्यांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातून 40 वन्यप्राण्यांचे ढेबेवाडी वनपरिक्षेत्रातील झोळंबी व जानीचा आंबा परिसरात यशस्वीरीत्या स्थलांतर करण्यात आले आहे.

5 ते 7 एप्रिल या कालावधीत ही विशेष मोहीम राबवण्यात आली. यामध्ये चितळ 30 (17 नर आणि 13 मादी), सांबर 10 (4 नर आणि 6 मादी) यांचा समावेश आहे. हे सर्व प्राणी पुणे ते झोळंबी अशा प्रवासात सुरक्षितपणे वाहनाद्वारे आणण्यात आले आणि त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रात वाघांच्या संवर्धनासाठी पोषक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. या भागात वाघांचे मुख्य खाद्य असलेल्या तृणभक्षक प्राण्यांची संख्या मर्यादित असल्याने केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणानुसार हा उपक्रम राबवण्यात आला. यामुळे नैसर्गिक अन्नसाखळी बळकट होण्यास मदत होणार आहे. सदर स्थलांतर मोहिमेसाठी पुण्यातील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट (बावधन) यांचे विशेष सहकार्य लाभले.

तुषार चव्हाण (क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र राखीव, कोल्हापूर), स्नेहलता पाटील (उपसंचालक, चांदोली वन्यजीव विभाग), संदेश पाटील (सहायक वनसंरक्षक, ढेबेवाडी), वनपरिक्षेत्र अधिकारी किरण माने यांच्या नेतृत्वाखाली वनपाल कशिलिंग बादरे, वनरक्षक बळवंत चक्रधर यांनी ही मोहीम फत्ते केली.