
भोंदूबाबा खरात प्रकरण महाराष्ट्राला काळिमा फासणारे आहे. या प्रकरणाची एसआयटीमार्फत योग्य चौकशी सुरू आहे. या चौकशीत सरकारी अधिकाऱयांची नावे आली तर भोंदू खरातला मदत करणाऱ्या सरकारी अधिकाऱयांना थेट बडतर्फ करण्यात येईल, असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिला.
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांची आणि काही अधिकाऱयांची नावे पुढे आली आहेत. या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी एसआयटीला पुरावे द्यावेत, असे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले. नाशिकच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचे जे काम झाले आहे, त्या संबंधित लोकांवर कडक कारवाई केली जाईल. आमच्या अधिकाऱ्यांनी मदत केली असेल तर त्यांची बदली होणार नाही, तर थेट बडतर्फीची कारवाई होईल. या प्रकरणात नाव आलेला अधिकारी मग कोणत्याही खात्यातील असो, एसआयटीकडून एखाद्या अधिकाऱ्याचे नाव पुढे आले तर त्याला नोकरीवर ठेवणार नाही. अशोक खरातच्या बंगल्याच्या आणि ऑफिसच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासणार आहोत. त्यात जे दिसून येतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. अशोक खरातला जमिनी-मालमत्ता जमा करण्यासाठी मदत करणाऱयांवरही कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.




























































