विलीनीकरणाबाबत संभ्रम, सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अजितदादांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी लोकभवन येथे झालेल्या छोटेखानी समारंभात सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेसचे एकत्रीकरण व्हावे ही अजितदादा यांची इच्छा होती. यासंदर्भात शरद पवार यांच्या पक्षासोबत त्यांची मागील सहा महिन्यांपासून चर्चा सुरू असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, अजित पवार गटाच्या सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी हात जोडत याबाबत तूर्तास तरी स्पष्ट बोलण्यास नकार दिल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दुसरीकडे, एकत्र येणे ही दादांची इच्छा असल्याचे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री बाळासाहेब पाटील यांनी नमूद केले आहे. यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यातील गुंता वाढल्याचे चित्र आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्यानंतर अजितदादांचा उत्तराधिकारी कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शुक्रवारी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अजितदादांच्या जागी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती व्हावी, अशी पक्षाचे कार्यकर्ते व जनभावना असल्याचे त्यांना सांगितले. त्यास फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देताच संबंधितांनी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून अजित पवार गटाच्या नेता निवडीसाठी पक्षाची शनिवारी दुपारी बैठक बोलावली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची एकमताने गटनेता म्हणून निवड करण्यात आली. याबाबतचे पत्र मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आले. यानंतर लोकभवन येथे सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

विधिमंडळ पक्षनेता निवडीसाठी विधान भवनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. सर्व आमदार आल्याची खात्री पटल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार  प्रफुल्ल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.  सुनील तटकरे यांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला.

या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पक्षनेता निवडीबाबत प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावानुसार,  सुनेत्रा अजित पवार यांची विधिमंडळ पक्षनेतापदी एकमताने निवड करण्यात आली. तसेच महाराष्ट्र विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विधानमंडळ पक्षनेता म्हणून व्हीप काढण्याचे तसेच विधिमंडळ कामकाज पार पाडण्यासाठी असलेले इतर सर्व संविधानिक अधिकारही त्यांना देण्यात आले.

‘एकच वादा अजित दादा’च्या घोषणा

सुनेत्रा पवार शपथ घेण्यासाठी व्यासपीठावर जाताना आणि शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या उपस्थित आमदारांनी अजित पवारांच्या नावाने घोषणा दिल्या. ‘अमर रहे अमर रहे अजित पवार अमर रहे’, ‘एकच वादा अजित दादा’, ‘महाराष्ट्राचा एकच वादा अजित दादा’ आणि ‘वहिनीसाहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या.

तीन खात्यांचा कार्यभार

राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ ही तीन खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे असतील. अर्थ व नियोजन विभागाचा कार्यभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहणार आहे.

खासदारकीचा राजीनामा

विधिमंडळ पक्षनेता निवडीच्या बैठकीला उपस्थित राहण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सीपी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सोपवला.

नव्या आशेने पुढे चालत राहीनसुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट  

उपमुख्यमंत्रीपदाची  शपथ घेतल्यानंतर  सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या विचारांना उजाळा देत समाजमाध्यमावरून भावना व्यक्त केल्या. या कठीण क्षणी महाराष्ट्रातील जनतेने दिलेली  प्रेमाची साथ हेच माझे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत नव्या आशेने पुढे चालत राहीन,  असे सुनेत्रा पवार यांनी एक्स या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये  म्हटले आहे.

आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्यभावनेने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

दादांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असला तरी, त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतिची बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठत आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहीन, अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली आहे.