लोकसंस्कृती – संतांच्या वाङ्मयाची प्रेरणा

>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक

भजनी मंडळांच्या वाटचालीचा आढावा घेताना सर्वप्रथम संगीताची उत्पत्ती कशी झाली आणि पुढे तिला आजची प्रगत अवस्था कशी आली, हे पाहावे लागते. संगीताच्या व्यापक क्षेत्रातील महत्त्वाचे अंग म्हणजे भक्ती संगीत. संतांच्या विविध वाङ्मयाची प्रेरणा भजनाच्या माध्यमातून, भक्ती संगीताच्या माध्यमातून साकारल्या आहेत. 

भजन या भारतीय लोककलेला फार मोठी परंपरा आहे. भारतवर्षातील संगीत परंपरेत भजन या लोककलेला अनन्यसाधारण व अविभाज्य महत्त्व प्राप्त झाले आहे. संगीत विश्वातील अनेक दिग्गज व नामवंत गायक, संगीतकार यांची सुरुवात भजन या लोककलेच्या माध्यमातून झाली आहे. भजनी मंडळांचा इतिहास व वाटचालीचा आढावा घेताना सर्वप्रथम संगीताची उत्पत्ती कशी झाली आणि पुढे तिला आजची प्रगत अवस्था कशी आली. याचा अभ्यास व संदर्भ घेऊन पुढे आजच्या प्रगत अवस्थेपर्यंत येत असताना विकासाच्या टप्प्यातून कशाप्रकारे जावे लागले, हे पाहावे लागते.

धर्म संगीताच्या व्यापक क्षेत्रातील एक महत्त्वाचे अंग म्हणजे भक्ती संगीत होय. ‘उपास्यदैवत आणि उपासनेतील अवस्था’ याविषयीचे भक्तांचे उत्कट उद्गार जेव्हा आशयाला अधिक गहिरे करणाऱया संगीताचा वेश घेऊन पदांच्या रूपाने अवतरतात, तेव्हा त्याला भक्ती संगीत म्हणतात.

परंपरेने आपल्या मनावर विशिष्ट संस्कार झालेले असतात. त्या संस्कारांमुळे विशिष्ट सूर कानावर पडले की, त्याची सांगड आपण काही विशिष्ट गोष्टींशी घातलेली असते. सनईचे सूर कानावर पडले की, लग्न सोहळ्यातील सुरम्य मंगलमय वातावरणाचा अनुभव प्रत्येक जण घेतो. पहाटेच्या वेळी सनई-चौघडय़ाचा दूरवरून आवाज ऐकू आला की, देवळातील प्रसन्नता भक्तांना प्रकर्षाने जाणवते. इतकेच नव्हे तर देवाच्या आराधनेत संगीताला आपल्या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक भाविक भक्तांच्या मनात भक्तीची भावना निर्माण करण्यासाठी फार पूर्वीपासून संगीताची आराधना केली जाते. टाळ-मृदंगाचा आवाज आला की, विठ्ठल भक्तीत न्हाऊन निघालेल्या भजनी दिंडीचा आपण आजही अनुभव घेतो. अशा तऱहेने भारतीयांच्या नसानसात संगीताचे स्वर घुमले आहेत. मानवाला जगण्यासाठी जीवनरस पुरवण्याची अद्भुत शक्ती संगीत कलेच्या ठायी आहे. या संगीत कलेलाच ‘नादब्रह्म’ म्हटले आहे. किती हा सार्थ आणि समर्पक शब्द! संगीतातील नाद म्हणजे जणू काही ब्रह्मरूप चित्रशक्ती. अखिल विश्वाचा पसारा मांडणाऱया ब्रह्मदेवाचेच दुसरे रूप म्हणजे ही संगीत कला. या देवाधिदेवाच्या आत्म्याचा हुंकार…नादब्रह्म! याविषयी संस्कृत भाषेत एक श्लोक आहे. आनंदमय असणाऱया आणि मनाला उल्हासित करणाऱया चैतन्यमय अशा नादब्रह्माची सर्वश्रेष्ठता या श्लोकातून व्यक्त झाली आहे. हा श्लोक असा…

चैतन्यं सर्वभूतानां विवृत्तं जगदात्मना। 

नादब्रह्म तदानन्दमद्वितीयमुपास्मदे ।।

भावार्थ : मन म्हणजे जे सर्व भूतांचे चैतन्य आहे आणि जे जगदात्म्याने व्यापलेले आहे. अशा त्या अद्वितीय, आनंदमय नादब्रह्माची आम्ही उपासना करतो.

भजन हा या नादब्रह्माचाच एक महत्त्वाचा भाग आहे. या सर्वश्रेष्ठ कलेचा थोडा तरी अंश ग्रहण करता आला तरी जीवन कृतार्थ होऊन जाईल, अशी या भजन कलेच्या उपासकांची श्रद्धा आहे. म्हणूनच भक्ती करता करता जीवनात पुण्याईची शिदोरी बांधावी या सद्हेतूने भजनी संप्रदायातील सहभागी कलाकार, गायक व वादक या भजनात दंग झालेचे आजही दिसून येते. अनेकांनी आपले संपूर्ण आयुष्य भजन कलेसाठी वाहिले आहे.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात भागवतधर्मीय संतांचे कार्य फार महत्त्वाचे आहे. म्हणूनच आज साडेसातशे वर्षांनंतरही संतांच्या विचारांची, त्यांच्या अभंगांची, त्यांच्या ग्रंथांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चाललेली दिसते आहे. तेव्हा संतांच्या विविध वाङ्मयाची प्रेरणा अभ्यासताना संतांनी भजनाच्या माध्यमातून तत्कालीन परिस्थितीत केलेले जनप्रबोधन आणि भक्ती, सदाचार याचा केलेला पुरस्कार ठळकपणे नजरेस दिसतो. भजनी संप्रदायाने सात्त्विक भाव जागृत करण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. जनांचे लोकरंजन करता करता नीतीच्या गोष्टी सांगत लोकशिक्षणाचा वसाही घेतल्याचे दिसून येते.

[email protected]

(लेखक मानसशास्त्राचे व लोककलेचे अभ्यासक आहेत.)