कोण खरा हिंदुस्थानी हे सर्वोच्च न्यायालय कसे ठरवणार? खासदार प्रियंका गांधी यांचा सवाल

खरा भारतीय कोण आहे हे सर्वोच्च न्यायालय ठरवू शकत नाही असे म्हणत खासदार प्रियंका गांधी यांनी राहुल गांधी यांचा बचाव केला आहे. तसेच सरकारला प्रश्न विचारणं ही राहुल गांधींची जबाबदारी आहे, कारण ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. कोणीही खरा हिंदुस्थानी असे विधान करू शकत नाही अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली होती. त्यावर प्रियंका गांधी यांनी हे विधान केले आहे.

प्रियंका गांधी म्हणाल्या, की माननीय न्यायमूर्तींचा संपूर्ण सन्मान ठेवून मी एवढंच सांगू इच्छिते की खरा भारतीय कोण आहे हे ठरवण्याचा अधिकार त्यांना नाही. सरकारला प्रश्न विचारणं हे विरोधी पक्षनेत्याचं कर्तव्य आहे. माझा भाऊ कधीही सैन्याविरोधात बोलणार नाही. त्याला सैन्याबद्दल प्रचंड आदर आहे. त्याच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रा’ दरम्यान भारतीय सैन्याबाबत दिलेल्या कथित वक्तव्यावर टीका करत म्हटलं होतं, “जर तुम्ही खरे भारतीय असाल, तर अशा गोष्टी बोलणार नाही.” असे असले तरी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात लखनऊमधील न्यायालयात गांधी यांच्याविरुद्ध सुरू असलेली कार्यवाही थांबवण्याचे आदेश दिले आहेत.