हाथरसची चेंगराचेंगरी गंभीर आणि चिंताजनक; सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल, मात्र सुनावणीस नकार

उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये घडलेल्या चेंराचेंगरीच्या दुर्घटनेची सर्वोच्च न्यायालयाने आज गंभीर दखल घेतली. ही दुर्घटना चिंताजनक आणि गंभीर आहे, असे मत न्यायालयाने नोंदवले आणि याचिकाकर्त्याला याबाबत उच्च न्यायालयात दाद मागण्याची सूचना केली. अशा घटना त्रासदायक आहेत. परंतु उच्च न्यायालये अशी प्रकरणे हाताळण्यासाठी सक्षम आहेत, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने नमूद केले आणि जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.

सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला अलाहाबाद उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश दिले आहेत. अशा प्रकारच्या घटना फार वेदनादायी असतात. मात्र उच्च न्यायालय अशा घटनांबाबत सुनावणी करण्यास सक्षम आहे, असे मत मांडत खंडपीठाने याचिका फेटाळली.

हाथरस येथे 3 जुलै रोजी भोले बाबाच्या सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सत्संग संपल्यानंतर भोले बाबाचा चरणस्पर्श झालेली माती गोळा करण्यासाठी भक्तांची झुंबड उडाली. यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि 125 जणांचा गुदमरून मृत्यू झाला तर दीडशेहून अधिक लोक जखमी झाले.