कोण भारतीय आहे कोण नाही याचे प्रशस्तीपत्रक न्यायालयाने देणे अयोग्य, खासदार वर्षा गायकवाड यांचे विधान

एक खरा हिंदुस्थानी असे विधान करू शकत नाही अशी टिपण्णी सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना केली होती. त्यावर कोण हिंदुस्थानी आहे कोण नाही याचे प्रशस्तीपत्रक न्यायालयाने देणे अयोग्य असे ,असे विधान काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

एक्सवर पोस्ट करून वर्षा गायकवाड म्हणाल्या की, संविधानाने भारतातील प्रत्येक नागरिकाला आपले मत आणि भूमिका मांडण्याचा अधिकार दिला आहे. सदृढ लोकशाहीसाठी विरोधी पक्षाने सरकार आणि त्यांच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित करणे ही त्यांची जबाबदारी असते. विशेषतः जर देशावर आक्रमण होत असेल, तर सरकारला प्रश्न हे विचारलेच गेले पाहिजेत.

असे असताना सर्वोच्च न्यायालयाने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भूमिकेवर भाष्य करताना ‘खरा भारतीय असे विधान करू शकत नाही,’ असे म्हटले. सर्वोच्च न्यायालयाचा आदर काँग्रेस पक्ष नेहमीच करत आला आहे पण न्यायालयाकडून अशी टिपण्णी अपेक्षित नाही.

कोणत्याही न्यायालयाकडून कायद्याच्या चौकटीचा सन्मान राखत नागरिकांच्या अधिकारांचे रक्षण करणे अपेक्षित आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे जेव्हा केंद्र सरकारला प्रश्न विचारतात तेव्हा ते प्रश्नचिन्ह सरकारवर असते देशावर नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची त्या पदावरची भूमिका आणि त्यांचे देशाप्रतीचे कर्तव्य यावर आक्षेप घेण्याची गरज नाही. कोण भारतीय आहे कोण नाही याचे प्रशस्तीपत्रक न्यायालयाने देणे योग्य नाही हे संविधानाला धरून नाही, असे नम्रपणे आम्हाला वाटते.

देशाच्या भूमीवर जर परकीय आक्रमण होत असेल तर एक लोकप्रतिनिधी आणि भारतीय म्हणून प्रश्न विचारले पाहिजेत आणि त्याला उत्तर देणे ही सरकारची जबाबदारी असते. सरकार आपल्या जबाबदारीमधून नेहमी पळ काढते. पण देशाच्या हिताचे प्रश्न विचारणे हीच खरी देशभक्ती आहे असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.