2006 Mumbai train blasts – हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, सुटका झालेले 11 आरोपी पुन्हा तुरुंगात जाणार?

मुंबईसह संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या रेल्वे बॉम्बस्फोट खटल्याचा धक्कादायक निकाल मुंबई उच्च न्यायालयाने जाहीर केला होता. आरोपींविरुद्ध सबळ पुरावे व दोष सिद्ध करण्यात सरकारला आलेले सपशेल अपयश तसेच तपासातील त्रुटी व साक्षीदार उलटल्याचा ठपका ठेवत न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या खंडपीठाने या खटल्यातील 12 आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला आता सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

12 आरोपींना निर्दोष सोडण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर गुरुवारी सुनावणी पार पडली. यावेळई सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. मात्र तुरुंगातून सुटका झालेल्या आरोपींना पुन्हा अटक करून तुरुंगात टाकले जाणार नाही हे देखील स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने आरोपींना नोटिसा देत एका महिन्याच्या आत बाजू मांडण्याची सूचना केली आहे. तसेच उच्च न्यायालयाचे निर्णय इतर मकोका कोर्टात वापरता येणार नाही, हे देखील सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

11 मिनिटात 7 बॉम्बस्फोट

11 जुलै 2006 रोजी लोकलमध्ये ऐन गर्दीच्या वेळी सात ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. पहिला बॉम्बस्फोट संध्याकाळी 6.24 वाजता झाला, तर शेवटचा बॉम्बस्फोट संध्याकाळी 6.35 वाजता झाला. माटुंगा, वांद्रे, खार, माहीम, जोगेश्वरी, बोरिवली आणि मीरा रोड येथे लोकलच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात हे स्फोट झाले. त्यात 189 प्रवाशांचा बळी गेला, तर 824 जण जखमी झाले.

5 जणांना फाशी, सात जणांना जन्मठेप

दरम्यान, या प्रकरणी मकोका कोर्टाने मुंबईतील मोहम्मद फैसल अतौर रहमान शेख, महाराष्ट्रातील जळगाव येथील आसीफ खान, बिहारमधील कमल अन्सारी, ठाणे येथील एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दिकी आणि नवीद खान यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. तर इतर सात दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यात मोहम्मद साजिद अन्सारी, मोहम्मद अली, डॉ. तनवीर अन्सारी, माजिद शफी, मुझ्झम्मिल शेख, सोहेल शेख आणि झमीर शेख या सात आरोपींचा समावेश होता. जन्मठेपेची शिक्षा झालेल्या अन्सारी याचा नागपूर तुरुंगात 2021 मध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.