
तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिवसेना पक्ष व ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या प्रकरणात अखेर सर्वोच्च न्यायालय सलग सुनावणीसाठी तयार झाले आहे. ‘हे प्रकरण खूप दिवस रखडलंय, आता हे प्रकरण अंतिमतः निकाली काढू’, अशी टिप्पणी सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या खंडपीठाने गुरुवारी केली आणि सलग काही दिवस दररोज दुपारी 2 वाजता सुनावणी घेण्यास तयारी दर्शवली. त्यानुसार पुढील दोन आठवडय़ांतच अंतिम सुनावणी होण्याची चिन्हे आहेत. पक्ष व चिन्हाबरोबर ‘गद्दार’ आमदारांच्या पात्रतेचा फैसला न्यायालय करणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका मागील तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. मूळ शिवसेनेशी गद्दारी करणाऱया शिंदे गटाला पक्षाचे नाव व ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे. याचिकेवर गुरुवारी सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. शिंदे गटाने मूळ शिवसेना पक्षावर बेकायदेशीर ताबा मिळवल्याचे अॅड. सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी सिब्बल यांना युक्तिवादासाठी आवश्यक वेळेबाबत विचारणा केले. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सिब्बल यांनी लगेच युक्तिवाद करण्यास तयार असल्याचेही सांगितले. मात्र शिंदे गटाचे वकील मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद करण्यासाठी आपली तयारी नसल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यामुळे पुन्हा नव्या तारखेसाठी चर्चा झाली. आपल्याला या प्रकरणात अर्जन्सी असल्याचे निदर्शनास आणून देत सिब्बल यांनी सलग सुनावणीसाठी विनंती केली. त्यांची विनंती मान्य करताना न्यायालयाने आता या प्रकरणाचा अंतिमतः निपटारा करण्यास तयार असल्याचे सांगून सलग काही दिवस दुपारी 2 वाजता सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार पुढील दोन आठवडय़ांतच शिवसेनेची अंतिम सलग सुनावणी होण्याची चिन्हे आहेत. गुरुवारी झालेल्या सुनावणीवेळी शिवसेनेतर्फे बाजू मांडताना अॅड. सिब्बल यांना अॅड. असीम सरोदे, अॅड. निशांत पाटील, अॅड. रवी अडसुरे, अॅड. रोहित शर्मा यांनी कायदेविषयक सहाय्य केले.
केवळ महाराष्ट्र नव्हे, संपूर्ण देशाचे लक्ष
केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाचे शिवसेनेच्या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे. आम्ही लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्याबाबत आग्रही आहोत. प्रतिवादी शिंदे गट मात्र वारंवार सुनावणी पुढे ढकलण्यासाठी चालढकल करत आहे, असे अॅड. सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.
शिंदे गटाचा वेळकाढूपणा
अॅड. कपिल सिब्बल यांनी शिवसेनेतर्फे युक्तिवाद करण्यास तयारी दर्शवली. आपल्याला युक्तिवाद करण्यासाठी दोन तास वेळ हवा असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर शिंदे गटाने पुन्हा वेळकाढूपणा केला. संपूर्ण प्रकरण समजून घेऊन करण्यासाठी वेळ हवा असल्याचे शिंदे गटातर्फे अॅड. मुकुल रोहतगी यांनी सांगितले.
‘गद्दारां’ची चिंता वाढली!
गद्दारी केलेल्या शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्याऐवजी पात्र ठरवणाऱया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला शिवसेनेचे मुख्य प्रतोद, आमदार सुनील प्रभू यांनी स्वतंत्र याचिकेद्वारे आव्हान दिलेले आहे. अॅड. सिब्बल यांनी पक्ष आणि चिन्हाबरोबरच गद्दारांच्या अपात्रतेचा फैसला करण्याबाबत आग्रही भूमिका मांडताच शिंदे गटाचे धाबे दणाणले. त्यावेळच्या आमदारकीची मुदत संपल्याचे सांगत शिंदे गटाच्या वकिलांनी ‘अपात्रते’च्या सुनावणीला विरोध केला. मात्र न्यायालयाने अॅड. सिब्बल यांच्या विनंतीची नोंद घेत सलग सुनावणी निश्चित केली. त्यामुळे शिंदे गटाची चिंता चांगलीच वाढली आहे.
कोर्टरूममधील चर्चा
सिब्बल – शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हाची अंतिम सुनावणी सुरू करावी.
सरन्यायाधीश – तुम्ही (सिब्बल) युक्तिवादासाठी तयार आहात का? आपल्याला किती वेळ लागेल?
सिब्बल – आम्ही तयार आहोत. युक्तिवादासाठी दोन तास पुरेसे आहेत.
रोहतगी – शिंदे गटाची बाजू मांडण्यासाठी आम्ही तयारी केलेली नाही. न्यायालयाने आम्हाला आणखी वेळ द्यावा.
सिब्बल – ह्यांचा असाच वेळकाढूपणा सुरू आहे. आम्ही लोकसभा निवडणुकीआधीपासून अर्जन्सी सांगतोय आणि हे चालढकल करताहेत.
सरन्यायाधीश – हे प्रकरण खूप दिवस रखडलंय. आता आणखी विलंब नको. आम्ही हे प्रकरण अंतिमतः निकाली काढण्यास तयार आहोत. म्हणूनच दुपारी 2 वाजताची वेळ निश्चित करून काही दिवस सलग सुनावणी घेऊ.



























































