घटस्फोटाच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, बीएमडब्लू कार आणि 12 कोटींची मागणी; महिलेला काय काय मिळालं?

supreme court

घटस्फोटाच्या प्रकरणात विभक्त पतीकडून पोटगी म्हणून मूलभूत गोष्टींची मागणी करण्याचा पत्नीला हक्क आहे. महिला त्या हक्काने न्यायालयाला विनंती करतात. महिलेची जीवनशैली आणि तिच्या गरजा विचारात घेऊन न्यायालय तसे निर्देशही देते. पण सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आलेले घटस्फोटाचे एक प्रकरण विशेष चर्चेत आले आहे. महिलेने पतीकडे आलिशान बीएमडब्ल्यू कार आणि तब्बल 12 कोटी रुपयांची मागणी केली. तिची अवास्तव मागणी धुडकावत न्यायालयाने निर्णय दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, पत्नीला मुंबईत फ्लॅट, फ्लॅटसोबत दिलेले दोन पार्किंग लॉट आणि दोन बीएमडब्लू कार देण्याचे आदेश न्यायमूर्ती चंद्रन यांनी दिले. पत्नीने याव्यतिरिक्त 12 कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने पत्नीची ही मागणी फेटाळली आहे. महिलेला केवळ फ्लॅट आणि दोन बीएमडब्लू कार मिळतील, नाहीतर ते मिळणार नाही, असे न्यायालयाने खडसावून सांगितले.

काय आहे प्रकरण?

मुंबईतील एका घटस्फोटाच्या प्रकरणात महिलेने पतीपासून घटस्फोट घेत त्याच्याकडे पोटगी स्वरुपात 12 कोटी रुपयांची मागणी केली होती. याशिवाय पती खूप श्रीमंत असल्याने फ्लॅट आणि एक बीएमडब्लू कार देण्यात यावे, असा युक्तीवादही महिलेने केला होता. महिलेची मागणी ऐकून न्यायालयात सर्वच हैराण झाले. याआधी न्यायालयाने एक फ्लॅट किंवा 4 कोटी रुपयांची रोख रक्कम घ्या असे म्हटले होते. तुम्ही उच्चशिक्षित आहात त्यामुळे चार कोटी रुपयांची रक्कम घ्या आणि पुणे, हैदराबाद, किंवा बंगळुरूमध्ये चांगली नोकरी शोधा, असेही न्यायालयाने म्हटले होते.

अखेर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर अंतिम निर्णय सुनावला असून महिलेची रोख रकमेची मागणी फेटाळून लावली. न्यायालयाच्या निर्णयानुसार महिलेला फ्लॅट आणि दोन बीएमडब्लू कार मिळतील.