शिवसेना आणि धनुष्यबाणावर आज सुनावणी

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे शिवसेनेचे प्रकरण सूचीबद्ध केले आहे. या सुनावणीकडे राजकीय वर्तुळासह महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेशी गद्दारी केलेल्या शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या 2022 मधील निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. यापूर्वी नोव्हेंबरमध्ये झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने अंतिम युक्तिवाद ऐकून घेण्यासाठी पुढील सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे शिवसेनेचे प्रकरण कार्यतालिकेत 37व्या क्रमांकावर सूचीबद्ध केले आहे.

महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि महापालिकांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत, तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. या धामधुमीतच न्यायालय सुनावणी पूर्ण करून निकाल देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अपात्रतेच्या निर्णयाची प्रतीक्षा

गद्दारी केलेल्या शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्याऐवजी पात्र ठरवणाऱ्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान देत शिवसेनेचे मुख्य प्रतोद, आमदार सुनील प्रभू यांनी स्वतंत्र याचिका दाखल केली आहे. शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या प्रकरणाबरोबरच या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय एकाचवेळी सुनावणी घेणार आहे. गद्दारांच्या अपात्रतेबाबत न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.

सरोदे म्हणाले…

हे प्रकरण तीन वर्षे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. नोव्हेंबरच्या सुनावणीवेळी न्यायालयाने सुनावणीचे दिवस व युक्तिवादासाठी वेळेचे विभाजन केले होते. या प्रकरणात निर्णयाला विलंब अन्यायकारक आहे. न्यायालयाने मेरिटवर निर्णय द्यावा ही अपेक्षा आहे, असे शिवसेनेचे वकील असीम सरोदे म्हणाले.