ते हिंदुस्थानी लेकीसाठी लढले, सुप्रिया सुळेंनी घेतला महायुतीच्या नेत्यांचा समाचार

बदलापूरमध्ये बाहेरच्या लोकांनी आंदोलन केले होते असा आरोप महायुतीच्या काही नेत्यांनी केला होता. पण हे लोक हिंदुस्थानी होते आणि त्यांनी हिंदुस्थानच्या लेकीसाठी आंदोलन केले होते असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. पुण्यात महाविकास आघाडीकडून निषेध आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी भरपावसात सुप्रिया सुळे यांनी भाषण केले.

सुळे म्हणाल्या की, बदलापूर असेल सातारा, कोल्हापूर, दौंड मधील घटना पाहता अशा अनेक घटना घडल्या आहेत. प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाहिये. काही घटनांची पोलिसांनी दखल न घेतल्याने म्हणून अशा कृती वाढल्या. पोलिसांचा धाक राहिलेला नाही. पुण्यातच काही अधिकाऱ्यांनी रक्ताचे नमुने बदलले, ड्रग्ज प्रकरणातील आरोपी पळून जातात. पुण्यात कोयता गँग सारखे प्रकार वाढले आहेत. असे म्हणत सुळे यांनी सरकारचा निषेध केला.

सुळे म्हणाल्या की, हे सरकार असंवेदनशील आहे. बदलापूरमध्ये जेव्हा आंदोलन झालं. तेव्हा सत्ताधारी लोक म्हणाले की आंदोलनात सहभागी झालेले लोक बाहेरचे होते. ते लोक कुठलेही का असेना ते हिंदुस्थानी होते आणि हिंदुस्थानच्या लेकीसाठी लढत होते. हे सरकार अतिशय असंवेदनशील सरकार होते. शेवटी हे सत्य बाहेर आलं. तिथे कुणीही बाहेरचं नव्हतं. ती जनता बदलापूरची सामान्य मायबाप जनता होती. याच्यातूनच सरकारची विचारधारा काय आहे हे उघड झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की पुण्यात बलात्काराची घटना घडली दोन महिन्यातच आम्ही त्याला फाशी दिली. अशी जर कृती झाली असेल तर आपण मुख्यमंत्र्यांचा जाहीर सत्कार करू हे जर सत्य असेल तर. सरकार जर आपल्या मुलींची काळजी घेत नसेल तर आपणच आपल्या मुलींची काळजी घेऊ. प्रत्येक शाळेत जाऊ आणि सांगू आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. यापुढे राज्यातील कुठल्याही मुलीवर अन्याय होऊ देणार नाही, ही जबाबदारी आपण घेऊयात. बदलापूरची घटना अतिशय गलिच्छ आहे. जोपर्यंत त्या आरोपीला शिक्षा होत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीचा कुठलाही कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही असेही सुळे म्हणाल्या.