
विमानाच्या लगेज डोअरवर मधमाशांचा थवा बसल्याने सूरत-जयपूर इंडिगो विमानाच्या उड्डाणाला सुमारे तासभर उशीर झाला. एअरलाईनच्या प्रवक्त्याने या घटनेची पुष्टी केली आहे. मधमाशा पळवण्यासाठी उपाययोजना करत विमानाचे उड्डाण करण्यात आले.
सूरतहून जयपूरला जाणारे इंडिगोचे एअरबस ए320 हे विमान दुपारी 4.20 वाजता उड्डाण करणार होते. मात्र प्रवाशांचे सामान विमानात भरत असताना क्रू मेंबरला लगेज डोअरवर मधमाशांचा थवा दिसला. मधमाश्यांना पांगवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी धुराचा वापर केला, मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरला.
अखेर अग्निशमन विभागाला बोलावण्यात आले. अग्निशमन दलाचे इंजिन धावपट्टीवर पोहोचले आणि सामानाच्या दरवाज्यावर पाणी फवारण्यास सुरुवात केली, त्यानंतर मधमाशा पळून गेल्या. अखेर तासभर उशिराने विमान जयपूरच्या दिशेने रवाना झाले.