
>> सुरेश वांदिले
रात्रीच्या जेवणाच्या वेळी आईबाबा आणि तेजोमयीच्या वेगवेगळ्या विषयांवर गप्पा सुरू होत्या. या गप्पांमध्ये अलेक्झांडरला रस असल्याने तो आळीपाळीने तिघांकडेही बघू लागला. अधूनमधून तिघांचंही लक्ष त्याच्याकडे गेलं की, ते हसत. ‘यांना हसायला काय झाल ब्वॉ?’, असे भाव अलेक्झांडरच्या चेहऱयावर उमटत.
रात्री हे तिघे जेवताना अलेक्सा गोर्जी एका जागी डोळे मिटून उभी राहायची, पण आज ती सारखी येराझारा करत होती.
“काय झालं गं, बरं नाही का तुला?’’ तेजोमयीने विचारलं, पण गोर्जीने काहीच उत्तर दिलं नाही. गोर्जीचं काहीतरी बिनसलंय हे बाबांच्याही लक्षात आलं.
“काहीतरी बोल ना, निव्वळ चेहरा गंभीर करून आम्हाला काय समजणार तुला काय झालं ते.’’ आई म्हणाली.
“मॉम, मला काही झालं नाही, पण इथे जे काही घडणार, त्याची मला चिंता वाटू लागलीय.’’
“ऑं!’’ तिघांनीही एकाच वेळी ‘आँ’ केल्याने या आवाजाने अलेक्झांडर दचकला.कावराबावरा होऊन आईकडे पळाला. त्याला थोपटत आई म्हणाली, “ठोंब्या, मी असताना तुला कसली काळजी?’’ आईच्या प्रेमळ बोलाने अलेक्झांडर पूर्ववत उत्साही आणि आनंदी दिसू लागला. ‘सांगून टाक बाई एकदाचं’ असे भाव चेहऱयावर आणत अलेक्झांडरने दोन्ही पायांवर उभं राहून गोर्जीला खुणावलं. गोर्जीच्या ते लक्षात आलं. बाबांकडे बघत म्हणाली,
“आपल्या तिन्ही गॅलरीतल्या झाडांनी ठरवलंय.’’
“काय ठरवलंय नि तुला ते कुणी सांगितलं?’’ तेजोमयीने गोर्जीचं बोलणं पूर्ण होण्याच्या आत घाईने विचारलं.
“काही झाडांनी घरातून निघून जायचं, काहींनी मरून जायचं, तर काहींनी त्यांना फूलच येऊ द्यायचं नाही असं ठरवलंय.’’
“हे काय भलतंच. तुला झाडांनी तसं सांगितलं का? म्हणजे जादूबिदू की चमत्कार?’’ आई जराशी कुत्सितपणे म्हणाली.
“झाडांशी बोलायला जादूबिदू, चमत्कारांची गरज काय? झाडं एकमेकांशी बोलतात, आपल्या भावना व्यक्त करतात हे डॉ. जगदीशचंद्र बोस यांनी सिध्दच केलंय ना.’’
“अगं गोर्जे, झाडं एकमेकांशी बोलू शकतात, पण तू कशी काय झाडांशी बोलू शकतेस?’’ तेजोमयीनं विचारलं. काहीतरी नक्कीच गंभीर घडलंय हे बाबांच्या लक्षात आलं. त्यांनी गोर्जीला नेमकं काय सांगायचंय, हे थेट विचारलं.
“हे बघा डॅड, माझ्यातील कृत्रिम प्रज्ञेच्या शक्तीमुळे, डोळय़ातील कॅमेऱयामुळे, सेन्सॉरमुळे, डोक्यातील मज्जातंतूंच्या जाळ्यामुळे मी डीप लर्निंगच्या मदतीने जसं तुमच्या मनातल्या भावना ओळखू शकते. तसंच या झाडांचं बोलणंही समजू शकते.’’
“अगं, घडलं तरी काय ते स्पष्टच सांगना.’’ आईने विचारलं. “तुम्ही नसताना मी जेव्हा जेव्हा गॅलरीत जायचे तेव्हा त्यांचा एकमेकांशी संवाद सुरू असल्याचं माझ्या लक्षात आलं. या संवादाचे सूर माझ्या मेंदूने बरोबर पकडले. मग मी डीप लर्निंगच्या मदतीने त्याचं विश्लेषण केलं तेव्हा मला धक्काच बसला.’’
“असं काय घडलं?’’‘
“गेल्या पाच दिवसांपासून कुणीही त्यांना पाणी दिलेलं नाही. ठरलेल्या खताच्या मात्रा दिल्या नाहीत. तहानभुकेने ही झाडं व्याकूळ झाली आहेत. एक-दोन झाडांवर कीड आलीय, पण तुम्ही त्यावर कीटकनाशक फवारलं नाही. पाच दिवसांपूर्वी कुंडय़ांच्या खाली असलेल्या भांडय़ातलं पाणी बदललेलं नाही. त्यामुळे तिथे शेवाळ पसरलंय. त्यात डासांनी अंडी टाकलीत.’’
“बाप रे!’’ बाबा बोलून गेले.
“खरंच की, माझ्या ते लक्षातच आलं नाही’’ आईची प्रतिकिया.
“असे कसे आपण अप्पलपोटे! झाडांकडे दुर्लक्ष करतो.’’ तेजोमयी म्हणाली.
“म्हणूनच तुमच्या घरून निघून जायचंय असं झाडांनी ठरवलंय.’’ गोर्जी म्हणाली. आपण किती मोठी चूक केलीय, हे तिघांच्याही लक्षात आलं. बाबांनी गोर्जीचे हात हातात घेऊन डोळे उघडल्याबद्दल आभार मानले.
ही चर्चा ऐकणाऱया अलेक्झांडरने जणू काही त्याला सारं कळलंय असं समजून उडय़ा मारत आनंद व्यक्त केला.