
श्री काळाराम मंदिरात आज गुरुवारी चैत्र पौर्णिमेपासून सूर्य किरणोत्सवाच्या चैतन्यदायी पर्वाला सुरुवात झाली. सूर्याच्या किरणांनी श्रीरामाच्या चरणकमलांना अभिषेक केला. पंधरा दिवस हा उत्सव सुरू राहणार असल्याचे मंदिराचे पुजारी धनंजय पुजारी यांनी सांगितले.
मंदिराच्या वैशिष्टय़पूर्ण रचनेमुळे हा किरणोत्सव पंधरा दिवस सुरू असतो. आज सूर्यकिरणे चरणकमलांवर होती, ती हळूहळू वर सरकत जाऊन रामरायांच्या तेजस्वी मुखापर्यंत पोहोचतील. सूर्यकिरणांचा हा अभिषेक आणखी दोन आठवडे अनुभवण्याची संधी भाविकांना मिळणार आहे.




























































