
आशिया कपच्या सुपर-4 फेरीत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर हिंदुस्थानचा कर्णधार सूर्यकुमार यादव आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरला आहे. 14 सप्टेंबरला सामन्यानंतर दिलेल्या वक्तव्यात सूर्यकुमारने अलीकडील हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवरील सैनिकी संघर्षाचा उल्लेख करत विजय शहीद जवानांना आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना समर्पित केला होता.
आयसीसीच्या आचारसंहितेनुसार क्रिकेटला राजकीय वा संवेदनशील मुद्दय़ांशी जोडणारी कोणतीही टिप्पणी नियमभंग मानली जाते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या वक्तव्यावर आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती. टॉसवेळी आणि सामन्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न केल्याने आधीच दोन्ही बाजूंमध्ये तणाव निर्माण झाला होता.
सामन्याच्या मानधनातून 30 टक्के दंड
आयसीसीचे सामना निरीक्षक रिची रिचर्डसन यांनी चौकशीनंतर सूर्यकुमारवर सामन्याच्या फीमधून 30 टक्के इतका दंड ठोठावला. हे लेव्हल-1 गुन्हा मानला गेला असून त्यामुळे त्याच्यावर कोणताही निलंबनाचा निर्णय झालेला नाही. सूर्यकुमारने आरोप नाकारले असले तरी पुसामन्यांमध्ये राजकीय स्वरूपाच्या कोणत्याही विधानापासून दूर राहण्याचा इशारा त्याला देण्यात आला आहे.