मराठी विजयी मेळाव्यानंतर सुशील केडियाचा माज उतरला; जाहीर माफी मागत चूक कबूल केली

मुंबईतील ठाकरे बंधूचा विजय मेळावा आणि मराठीचा जयघोष महाराष्ट्रात घुमला. तसेच या मेळाव्यानंतर मराठीद्वेष्ट्या सुशील केडियादेखील भानावर आला असून त्याने जाहीर माफी मागितली आहे. मी 30 वर्षे मुंबईत राहून व्यवसाय करतोय पण मी मराठी बोलणार नाही, असे जाहीर आव्हान देणाऱ्या सुशील केडिया अखेर गुडघ्यावर आलाय. ठाकरे बंधुंच्या मेळाव्याला अर्ध्या तास झाला नसतानाही त्याने आपला माफीनामा जाहीर केला आहे.

चुकीच्या मनस्थितीत, दबाव, तणावाखाली आणि हतबलतेने आपण ट्विट केले होते. मराठी येत नसल्याने राज्यात वादाचे प्रमाण वाढले होते. या घटनांवरून आपण ओव्हररिऍक्ट करत प्रतिक्रिया दिली. 30 वर्षे मुंबईत राहूनही मला मराठी भाषेची जितकी प्रावीण्यता मिळवता आलेली नाही. त्यामुळे मी मराठी भाषा फक्त अनौपचारिक वातावरणात आणि जवळच्या लोकांसोबत वापरतो. भयाचे वातावरण असल्याने मराठी भाषेचा वापर करताना अनावश्यकपणे चुका होण्याची शक्यता असते, ज्यामुळे वाद निर्माण होऊ शकतो, असे ते म्हणाले. तसेच आपल्या ट्विटबाबत जाहीर माफी मागितली आहे.

आपण राज ठाकरे यांच्याबद्दल नेहमीच आदर आणि कृतज्ञता बाळगली आहे. केडिया यांनी आपली चूक मान्य करत राज ठाकरे यांनी आपल्या नम्र विनंतीचा विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. धमकी नाही तर प्रेम लोकांना एकत्र आणते, असेही सुशील केडिया म्हणाले. सुशील केडिया यांनी एक्स पोस्टवर व्हिडीओ पोस्ट करत माफी मागितली. मी राज ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी माझ्या नम्र विनंतीचा विचार करावा, असं केडिया म्हणाले. माझे ट्विट चुकीच्या मानसिक स्थितीत तणावाखाली झाले होते आणि त्याचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. मराठी न जाणणाऱ्यांवर झालेल्या हिंसाचाराच्या दबावाखाली येऊन मी अतिरेकी प्रतिक्रिया दिली. माझी चूक मी स्विकारतो. मी आशा करतो की जे हे वातावरण शांत करण्याचे आणि मराठी सहजतेने स्वीकारू शकण्याचे काम करु शकतील त्यांनी ते करावं. मी त्यांचा आभारी असेल,” असं केडिया म्हणाले.