कोर्लईच्या समुद्रात आढळलेली ‘ती’ संशयित बोट मासेमारी जाळीचा बोया, रायगड पोलिसांकडून स्पष्टीकरण

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात कोर्लई सुमद्रात सोमवारी सकाळी संशयित बोट आढळून आली होती. ही बोट पाकिस्तानची असल्याचा संशय असल्याने रायगड पोलीस, तटरक्षक दल, नौदल, सीमाशुल्क विभाग, मत्स्य व्यवसाय विभाग, महाराष्ट्र मेरी टाईम बोर्ड, सागर रक्षक दल यांना तात्काळ तपास सुरू केला. तपासाअंती ही बोट पाकिस्तानी नसून मासेमारी जाळीचा बोया असल्याचे निष्पन्न झाले. रायगड पोलिसांनी सोमवारी सायंकाळी प्रेस निवेदन जारी करत ही माहिती दिली.

हा मासेमारी जाळीचा बोया वर्ग ब एआयएस ट्रान्सपांडर्ससह हिंदुस्थानच्या सागरी हद्दीत वाहून आल्याचे भारतीय तटरक्षक दल स्पष्ट केले. संशयित बोटीची माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाकडून हेलिकॉप्टरद्वारे सागरी किनाऱ्यांची टेहाळणी सुरू करण्यात आली. या शोध मोहिमेत रायगड जिल्हा पोलीस दलातील 52 अधिकारी आणि 554 पोलीस अंमलदार यांची वेगवेगळी पथकेही सहभागी झाली होती.