
फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीने आपल्या ग्राहकांना ऐन सणासुदीच्या काळात जोरदार झटका दिला आहे. कंपनी आता प्रत्येक फूड डिलिव्हरी ऑर्डरवर 14 रुपये वसूल करत आहे. याआधी स्विगी प्लॅटफॉर्मची फी 12 रुपये होती. स्विगीने या फीमध्ये दोन रुपयांची वाढ केली आहे. स्विगीवरून ऑनलाईन जेवण ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना आता प्रत्येक ऑर्डरवर दोन रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. कंपनीला या दोन रुपये वाढीचा चांगलाच फायदा होण्याची शक्यता आहे. कंपनीने याआधीही फीमध्ये वाढ केलेली आहे.
मुंबई, दिल्ली, चेन्नई या प्रमुख शहरात स्विगीवरून मोठय़ा प्रमाणात ऑनलाइन ऑडर केल्या जातात. एप्रिल 2023 मध्ये स्विगीने पहिल्यांदा आपल्या ग्राहकांकडून प्लॅटफॉर्म फी घेणे सुरू केले होते. यानंतर कंपनीने हळूहळू प्लॅटफॉर्म फी वाढवली. सध्या स्विगीवरून दररोज 20 लाख ऑर्डर येतात. स्विगीने दोन रुपयांची वाढ केली आहे. यामुळे स्विगीला दररोज 2.8 कोटी रुपयांची अतिरिक्त मिळकत होईल. प्रत्येक तिमाहीत 8.4 कोटी रुपये आणि वर्षभरात 33.60 कोटी रुपयांचा लाभ मिळेल. कंपनीने दोन रुपयांची वाढवलेली फी सण-उत्सवानंतर कमी करणार की वाढलेली फी कायम ठेवणार, हे सण-उत्सव संपल्यानंतर स्पष्ट होईल.
n गेल्या काही महिन्यांत झोमॅटो आणि स्विगीने प्लॅटफॉर्म फीमधून कोटय़वधी रुपये कमावले आहेत. याचे विशेष कारण म्हणजे प्लॅटफॉर्म फी वाढवल्यानंतरसुद्धा कंपनीच्या ऑर्डरवर याचा कोणताही परिणाम झाला नाही. एप्रिल 2023 मध्ये स्विगीची प्लॅटफॉर्म फी केवळ दोन रुपये होती. अवघ्या दोन वर्षांत ती 14 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
n 31 जुलैला स्विगीने तिमाहीचे परिणाम जाहीर केले. यात कंपनीला 1197 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे म्हटले आहे. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ तोटा 611 कोटी रुपये होता. म्हणजेच वार्षिक आधारावर कंपनीचा तोटा 96 टक्के वाढला आहे, तर या उलट झोमॅटोचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 90 टक्के वाढून 25 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.