
Syed Mushtaq Ali Trophy चा रणसंग्राम दिवसेंदिवस अधीक रोमांचकारी होत आहे. आयुष म्हात्रेसह अनेक तरुण खेळाडूंनी आपल्या खेळाची झलक गेल्या काही दिवसांमध्ये दाखवून दिली आहे. यामध्ये आता अमित पासी या तरुण तडफदार फलंदाजाचा समावेश झाला आहे. अमित पासीने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच गोलंदाजांची धुलाई केली आहे. त्याने 55 चेंडूंमध्ये वादळी खेळी करत 114 धावांची सलामी दिली आहे.
बडोदा संघाकडून टी20 क्रिकेटमध्ये अमित पासीने पदार्पण केले आणि सलामीला फलंदाजीला येत गोलंदाजांना चोपून काढलं. अमित पासीने भेधडक फलंदाजी करत 24 चेंडूंमध्ये अर्धशतक आणि 44 चेंडूंमध्ये शतक ठोकलं. त्याने 55 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने एकूण 114 धावांची सलामी दिली. अमित पासीच्या धुवांधार फटकेबाजीने सर्वांचीच मन जिंकली. तसेच त्याने टी20 पदार्पणात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत पाकिस्तानच्या बिलाल असिफच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. बिलाल असिफने मे महिन्यात पदार्पणाच्या सामन्यात 10 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 48 चेंडूंमध्ये 114 धावा केल्या होत्या.
साखळी फेरीत आज (08 डिसेंबर 2025) बडोदाविरुद्ध सर्व्हिसेस यांच्यामध्ये सामना खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना बडोदाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 220 धावांचा डोंगर उभा केला आणि सर्व्हिसेस संघाला 221 धावांचे तगडे आव्हान दिले होते. मात्र, आव्हानाचा पाठलाग करताना सर्व्हिसेसनेही कडवी झुंद देत 207 धावांपर्यंत मजल मारली, परंतू अखेरच्या क्षणी सामना बडोदाने आपल्या बाजून फिरवला आणि 13 धावांनी सामना जिंकला.


























































