
हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान हा टी20 वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा सामना 9 जून 2024 (रविवारी) होणार आहे. मात्र या हायहोल्टेज सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचे सावट असून तसा संदेश ISIS ने जारी केला होता. हा हल्ला ‘लोन वुल्फ’ प्रकारचा असल्याचे सांगितले जात आहे.
T20 World Cup 2024 मध्ये मोठमोठे उलटफेर होताना पाहायला मिळत आहेत. अमेरिकेने पाकिस्तानला नमवत सर्वांनाच मोठा धक्का दिला. पाकिस्तानचा पुढचा सामना टीम इंडिया विरुद्ध 9 जून रोजी होणार आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांचे राजकीय संबंध चांगले नाहीत. त्यामुळे या हायहोल्टेज सामन्यावर पोलिसांची करडी नजर असणार आहे. अशातच या सामन्यावर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देणारा देणारा एक संदेश ISIS ने जारी केला आहे. लोन वुल्फ प्रकारच्या या दहशतवादी हल्ल्यात प्रामुख्याने एका व्यक्तीकडून हल्ला केला जातो. त्यामुळे न्युयॉर्कमध्ये जागोजागी पोलिसांनी गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. विशेष करुन नसाउ काउंटी स्टेडियमच्या आसपास मोठ्या संख्यने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
या संदर्भात नसाउ काउंटी चे पोलीस अधिकारी पॅट्रिक रायडर यांनी माहिती दिली. “आम्ही सुरक्षा व्यवस्थेवर बारीक लक्ष ठेवून आहोत. आम्ही आमच्या सहकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहोत, जे आम्हाला वेळोवेळी योग्य माहिती देत आहेत. त्यामुळे आम्ही गुप्त पद्धतीने सुद्धा देखरेख ठेवत आहोत. सध्या सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे,” अशी माहिती पॅट्रिक रायडर यांनी दिली.
हिंदुस्थान-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी ज्यांच्याकडे तिकीट नसेल अशा चाहत्यांसाठी मैदानाच्या जवळ सीडर पार्क येथे मोठ्या स्क्रिनवर सामना पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी सुद्धा कडेकोट सुरक्षा व्यवस्था असणार आहे. तसेच सामन्याच्या दिवशी नसाउ काउंटी स्टेडियमच्या आसपासचा संपूर्ण परिसर नो फ्लाय झोन घोषित करण्यात आलेला आहे.